बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या स्टॅंडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स क्लबचा होतकरू लांब उडीपटू जाफर खान सरोवरण याने आपण राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू असल्याचे सिद्ध केले असून त्याला राज्यपालांच्या हस्ते ‘सर्वोत्तम क्रीडापटू’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
उडपी येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते जाफर खान सरोवरण याने संपूर्ण कर्नाटकातील ‘सर्वोत्तम क्रीडापटू’ हा पुरस्कार स्वीकारला.
बेळगाव शहरातील भरतेश महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या सहाव्या सेमिस्टरचा विद्यार्थी असणारा जाफर खान सरोवरण हा स्टॅंडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स क्लबचा सदस्य आहे. त्याने ॲथलेटिक्स विभागातील लांब उडी प्रकारात विशेष प्राविण्य मिळवले असून आजपर्यंत फक्त शहर व जिल्हास्तरीयच नाहीतर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जाफर खान याने जिंकल्या आहेत.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात लांब उडी क्रीडा प्रकारामध्ये त्याने अल्पावधीत आपला असा वेगळा दबदबा निर्माण केला असला तरी विनयशील स्वभावामुळे त्याला त्याचा गर्व नसल्याचे त्याचे सहकारी व हितचिंतक कौतुकाने सांगतात.
अलीकडे झालेल्या राज्यस्तरीय लांब उडी स्पर्धेमध्ये जाफरखान याने 7.53 फूट इतकी मोठी झेप घेऊन मागील स्पर्धा विक्रम मोडीत काढताना नवा स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला आहे. सदर कामगिरी तसेच वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक गुणांसह नोंदविलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन त्याची राज्यातील ‘सर्वोत्तम क्रीडापटू’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जाफरखान सरोवरण याला आई-वडिलांसह भरतेश महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचे प्रोत्साहन, तसेच स्टॅंडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक प्रदीप जुवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल क्रीडापटू जाफर खान सरोवरण याचे स्थानिक ॲथलेटिक क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.