बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात आज पहाटे पहाटेच आयकर विभागाने धाडसत्र मोहीम उघडल्याने ‘काळेधन’ बाळगणाऱ्या अनेक सरकारी बाबुंचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी आयकर विभागाने बेळगावात पहाटेपासून छापे मारण्यास सुरुवात केली. याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसली तरीही आयकर विभागाच्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी पहाटे उद्योजकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. यामुळे उद्योजकांमध्ये खळबळ माजली असून काळा पैसा, बेहिशेबी मालमत्ता जमा केलेल्या मंडळींची झोपच उडाल्याची चर्चा बेळगावमध्ये दिवसभर रंगली होती.
मंगळवारी पहाटेपासूनच बेंगळुरू आणि गोव्यातील अधिकाऱ्यांनी बेळगावमध्ये तळ ठोकला असून संबंधित उद्योजकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे आयकर विभागाच्या तीक्ष्ण नजरेपासून वाचण्यासाठी अनेकांची धांदल उडाल्याचेही बोलले जात आहे.
यापूर्वीदेखील बेळगावमधील बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. अलीकडेच खानापूरमध्ये लोकायुक्त अधिकाऱ्यांची धाड पडली आहे.
सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही बड्या उद्योजकांच्या घरांसह कार्यालयांची झडती घेत महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. यात आयकर विभागाच्या हाती काय घबाड सापडले याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.