बेळगाव लाईव्ह : कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी येथे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. ही घटना हिट अँड रन प्रकरण असून, पोलिसांनी तपासासाठी दोन विशेष पथकांची स्थापना केली आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी, गनमॅन इरप्पा आणि चालक शिवप्रसाद गंगाधरय्या या चार जणांचा समावेश असलेल्या वाहनाला कंटेनर वाहनाने धडक दिली. ही घटना कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी येथे घडली होती.
याबाबत आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, कंटेनर वाहन कुत्र्यांना चुकवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने मंत्री यांच्या वाहनाला धडकले. या अपघातानंतर वाहन झाडाला जाऊन आदळले.
वाहन पंचनाम्यात वाहनाच्या उजव्या बाजूस नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना हिट अँड रन प्रकरण असल्याने कंटेनर वाहनाचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी वाहनाच्या पुढे कुत्रा आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्राथमिक तपास, एफआयआर आणि घटनास्थळाच्या पाहणीत वाहनाला कंटेनरने धडक दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
अपघाताच्या वेळी टोल गेट ओलांडलेली सुमारे 42 कंटेनर वाहने तपासली जात आहेत. वाहनाचा चालक फरार असून, मंत्री यांच्या चालकाने दिलेल्या तक्रारीवरून तपास सुरू आहे. सरकारी वाहन अपघातस्थळावरून का हलवण्यात आले, याचीही चौकशी केली जात आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, नवीन कायद्यांनुसार अपघात झालेल्या वाहनधारकांना मदत न करणे गुन्हा ठरतो. घटनास्थळी कोणतेही पूर्व नियोजन आढळलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय वैमनस्याचा कोणताही उल्लेख तक्रारीत नाही. मात्र, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. कंटेनर वाहनाचा लवकरच शोध लागेल, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला.