Monday, January 20, 2025

/

हिडकल उपप्रादेशिक विज्ञान केंद्र आणि मिनी ताराघर लवकरच लोकार्पण होणार: मंत्री एन.एस. बोसराजू

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण करून त्यांना अधिक ज्ञान मिळावे यासाठी विविध ठिकाणी विज्ञान केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. हिडकल उपप्रादेशिक विज्ञान केंद्र आणि मिनी ताराघराचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती लघु पाटबंधारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री एन.एस. बोसराजू यांनी दिली.

हिडकल उद्यानात सोमवारी (२० जानेवारी) राजा लखमगौडा उद्यान विकास योजनेअंतर्गत या केंद्राच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा अभ्यास आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी सरकारने अनेक योजनांची आखणी केली आहे.

सुमारे ८ ते ९ जिल्ह्यांमध्ये विज्ञान केंद्र उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. बेंगळुरूच्या हेब्बाळ येथे आशिया खंडातील उत्कृष्ट सायन्स गॅलरी उभारली जात आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक जिल्ह्यात ताराघर उभारणीसाठी निधी वितरित केला आहे.

चिक्कमगलुर जिल्ह्यातील पिलीकुळु येथे ३५० एकर जागेत देशातील सर्वात मोठ्या ताराघराची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यातील ८३३ निवासी शाळांना दुर्बिणी (टेलिस्कोप) आणि लॅबोरेटरी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, या केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गोकाक फॉल्स, बेळगावच्या राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय आणि हिडकल धरणाच्या विकासासह पर्यटन सर्किट उभारले जाईल.

हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील विज्ञानाशी संबंधित ही पहिली योजना आहे. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत.

या समारंभास हुक्केरी तहसीलदार मंजुळा नायक, मुख्य अभियंता बी.आर. राठोड आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.