Wednesday, January 8, 2025

/

एचएमपीव्ही : आरोग्य, कुटुंब कल्याण खात्याने जारी केली मार्गदर्शक प्रणाली

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चीनमध्ये एचएमपीव्ही या श्वसन संक्रमणाचा उद्रेक झाल्यानंतर भारतात पहिल्यांदा कर्नाटकची राजधानी बेंगलोर शहरांमध्ये सदर विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर एचएमपीव्ही संसर्गासंदर्भात कर्नाटक राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे.

ह्यूमन मेटापेनिमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा विषाणू म्हणजे इतर सर्वसामान्य श्वसन संक्रमणासारखेच एक श्वसन संक्रमण आहे. ज्यामुळे हिवाळ्यात नेहमीसारखा ताप येतो आणि फ्ल्यू सारखी लक्षणे विशेष करून बालकं आणि वयोवृद्धांमध्ये दिसतात.

आरोग्य खात्याच्या नियमित तपासणी दरम्यान कर्नाटकमध्ये बेंगलोर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये एचएमपीव्ही बाधित दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन रुग्णांपैकी एकावर यशस्वी उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या रुग्णाला देखील लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. दोन्ही रुग्णांना झालेला संसर्ग हा सौम्य स्वरूपाचा होता आणि त्यांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने सर्वसामान्य ताप, आयएलआय आणि सारी यासारख्या श्वसन संसर्गासंदर्भातील माहितीचे पृथक्करण केले असता मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या डिसेंबरमध्ये राज्यात आढळून आलेल्या संबंधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय अशी वाढ झालेली नाही.

दरम्यान एचएमव्हीपी संदर्भात कर्नाटक राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने कांही मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली असून नागरिकांना तिचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मार्गदर्शक प्रणाली पुढील प्रमाणे आहे.

1) शिंक अथवा खोकला आला तर रुमाल किंवा टिशू पेपरचा वापर करा. 2) सातत्याने साबण किंवा सॅनिटायझरने हात धुवून घ्या. 3) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. 4) जर तुम्हाला ताप अथवा खोकला असेल किंवा शिंका येत असतील तर सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. 5) शक्यतो हवेशीर ठिकाणी वावर करावा. 6) अंगात जर कणकण जाणवत असेल तर घरीच रहा आणि शक्यतो दुसऱ्याच्या संपर्कात येऊ नका. 7) सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

या गोष्टी टाळा : 1) टिशू पेपर व रुमाल यांचा पुन्हा वापर करू नका. 2) आजारी माणसांच्या जवळ जाऊ नका, त्यांचे टॉवेल किंवा कपडे वापरू नका. 3) डोळे, नाक आणि तोंड यांना सतत हात लावू नका. 4) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. 5) स्वनिर्णयाने औषध न घेता डॉक्टरांशी संपर्क साधा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.