Friday, January 10, 2025

/

करंबळ, जळगे येथे धुमाकूळ घालणारा जंगली हत्ती अखेर जेरबंद!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील करंबळ व जळगे गावांच्या परिसरात ठाण मांडून तेथील ऊस व भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका जंगली हत्तीला वनखात्याने आज गुरुवारी चार प्रशिक्षित हत्तींच्या सहाय्याने शिताफीने जेरबंद केले.

याबाबतची माहिती अशी की, गेल्या सुमारे तीन महिन्यापासून एक जंगली हत्ती खानापूर तालुक्यातील खानापूर शहराजवळील करंबळ व जळगे या गावांच्या आसपास असलेल्या शेतांमध्ये ठाण मांडून होता. सदर हत्तीकडून शेतातील ऊस आणि भात पिक फस्त करण्याबरोबरच बहुतांश पीक तुडवून नष्ट करण्याचा प्रकार सुरू होता.

आपल्या वास्तव्याने त्या हत्तीने परिसरात दहशत निर्माण केली होती. दरम्यान त्या हत्तीच्या धुमाकूळामुळे हाता तोंडाशी आलेल्या भात व ऊस पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने करंबळ व जळगे येथील चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे त्या जंगली हत्तीचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचा तगादा लावला होता.

शेतकऱ्यांची मागणी आणि निर्माण झालेली एकंदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या जंगली हत्तीला पकडण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून आज गुरुवारी शिमोगा येथून ट्रक मधून चार प्रशिक्षित हत्ती मागवण्यात आले. या चार ट्रक सोबत पकडलेल्या जंगली हत्तीला घेऊन जाण्यासाठी आणखी एक भक्कम पिंजरा असलेला खास सुरक्षित ट्रक मागविण्यात आला होता.

एक क्रेन देखील आणण्यात आली होती. या पद्धतीने हत्तीला पकडण्यासाठी सर्व ती पूर्व सिद्धता करण्यात आली. त्यानंतर ट्रँक्विलायझर अर्थात गुंगीचे औषध देऊन वन्य प्राण्यांना पकडणाऱ्या तज्ञ शूटर करवी शेतात ठाण मांडून असलेल्या जंगली हत्तीवर दुरून ट्रँक्विलायझर इंजेक्शन झाडण्यात आले.Elephant

इंजेक्शन टोचले जाताच अल्पावधीत अर्धवट बेशुद्ध झालेल्या त्या जंगली हत्तीच्या पायांना दोरा बांधून चार प्रशिक्षित हत्तींच्या सहाय्याने ओढत त्याला पिंजरा असलेल्या खास सुरक्षित ट्रकपर्यंत आणण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने त्या जंगली हत्तीला ओढून आणलेल्या खास ट्रकमध्ये जेरबंद करण्यात आले.

जंगली हत्तीला पकडण्याची वनखात्याची मोहीम पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जेरबंद करण्यात आलेल्या त्या जंगली हत्तीची रवानगी शिमोगा येथे केली जाणार आहे. या पद्धतीने गेले तीन महिने भात व ऊस पिकाचे अतोनात नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या हत्तीला पकडण्यात आल्यामुळे करंबळ व जळगे येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.