बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड संचलित कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी माध्यमिक शाळेमध्ये आयोजित ‘शालेय भोजनालय’ खाद्याचे माहेरघर, उत्सव आरोग्यवर्धक खाद्यपरंपरेचा हा शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठीच्या नाविन्यपूर्ण अन्नोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला.
शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार, प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. नीता देशपांडे, बेळगाव लाईव्ह न्यूज पोर्टलचे संपादक प्रकाश बिळगोजी, व्हॉइस ऑफ बेलगामचे मंजुनाथ आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींच्या स्वागत गीतानंतर उपस्थित पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात शाळेतील मुला मुलींनी भरविलेल्या ‘शालेय भोजनालय’ खाद्याचे माहेरघर, या अन्नोत्सवाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय जीवनात स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणे हे देखील किती महत्त्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. अभ्यास खेळा बरोबरच मुलांनी छंद किंवा एक प्रकारचे चिंतन म्हणून स्वयंपाक करण्यास शिकले पाहिजे.
स्वयंपाक बनवण्याचा छंद भविष्यात तुमच्या अर्थांजनाचे साधन ही बनू शकतो. या अनोत्सवातून तुम्ही स्वयंपाक बनवण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे त्याचप्रमाणे यामध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव नसतो. कोणताही छंद अथवा व्यवसाय कोणा एकासाठी नसून ते कोणीही करू शकतात. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते.
आपले जीवन आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येकाने कोणता ना कोणता छंद जोपासायला हवा. स्वयंपाकाचा छंद तुम्ही दीर्घकाळ जोपासून त्याचे व्यवसायात परिवर्तन कराल तर तुम्हाला खूप उत्पन्न मिळेल तेव्हा आतापासूनच त्यावर लक्ष केंद्रित करा असे सीईओ राजीव कुमार यांनी सांगितले.
डॉ. नीता देशपांडे यांनी आपल्या भाषणात कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आयोजित केलेल्या अन्नोत्सवाची प्रशंसा करून निरोगी तंदुरुस्त आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले. विशेष करून आहारात कडधान्यांबरोबरच पालेभाज्यांना प्राधान्य देण्यावर त्यांनी अधिक भर दिला. संपादक प्रकाश बिळगोजी यांनी आपल्या मनोगतामध्ये नुकत्याच पार पडलेल्या रोटरी अन्नोत्सवाचे उदाहरण देताना कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी हायस्कूलच्या मुला -मुलींनी आयोजित केलेला हा अन्नोत्सव म्हणजे रोटरीचा मिनी अन्नोत्सवचे असल्याचे मत व्यक्त केले.
या अन्नोत्सवातील शिस्त प्रशासनीय असल्याचे सांगून उत्सवात मांडण्यात आलेले अन्नपदार्थ विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारे आहेत. आजच्या आधुनिक युगात यासारख्या महोत्सवांना खूप महत्त्व आहे बेळगावात नुकत्याच झालेल्या रोटरी अन्नोत्सवाला हजारो लोकांनी भेट दिली असे सांगून कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी शाळेच्या व्यवस्थापनाने राबविलेला हा अन्नोत्सवाचा उपक्रम स्तुत्य असून विद्यार्थी विद्यार्थिनींच्या ज्ञानात भर टाकणारा आहे, असे सांगून त्यांनी अन्नोत्सवाला शुभेच्छा दिल्या. संतोष दरेकर यांनी यावेळी बोलताना या अन्नोत्सवात मांडण्यात आलेले अन्नपदार्थ हे संपूर्णपणे घरगुती आहेत हे विशेष असल्याचे सांगून समायोचीत विचार व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेच्या ऑडिटर मॅरलीन कोरिया यांच्यासह शाळेचा शिक्षक वर्ग पालक हितचिंतक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते उद्घाटन समारंभनंतर प्रमुख पाहुण्यांनी अन्नोत्सवाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी मांडलेल्या स्टॉल्सना भेट देत त्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची प्रशंसा केली.