बेळगाव लाईव्ह : शाकंभरी पौर्णिमेसाठी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागाने सौंदत्ती यात्रेसाठी ५० अतिरिक्त बसेसची सोय केली आहे.
या विशेष बससेवेमुळे यात्रेच्या काळात भाविकांना अधिक सुविधा मिळणार आहेत. या बसेस ९ जानेवारीपासून १९ जानेवारीपर्यंत उपलब्ध असतील.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव-सौंदत्ती मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत या बसेस धावणार आहेत. प्रवासासाठी तिकिटाचा दर १२० रुपये ठेवण्यात आला आहे. शक्ती योजनेंतर्गत लाभार्थींसाठी प्रवास मोफत असेल.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सौंदत्ती रेणुका देवी (यल्लम्मा) यात्रेत मोठी गर्दी अपेक्षित आहे.
प्रवाशांना आगाऊ तिकिटे बुक करण्यासाठी ksrtc.karnataka.gov.in या संकेतस्थळावर सोय करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान प्रवाशांचा अनुभव सुकर होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.