बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस प्रसूती विभागातील बाळंतिणी आणि नवजात शिशु तसेच अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असून हि बाब चिंताजनक आहे. यासंदर्भात आज चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांची भेट घेतली. या वेळी रुग्णालयातील सुविधा सुधारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बेळगाव जिल्हा रुग्णालयातील म्हणजेच बिम्समध्ये गर्भवती महिला आणि नवजात अर्भक मृत्यूदर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक व महापौर संघटनेच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी आमदार रमेश कुडची यांच्या नेतृत्वाखाली बिम्सचे संचालक अशोक शेट्टी यांच्यासोबत झालेल्या या चर्चेत रुग्णालयातील मूलभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावावर भर देण्यात आला. अलीकडे बिम्समध्ये गर्भवती महिलांना आणि नवजात अर्भकांना पुरेशा सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच स्वच्छता व्यवस्थेच्या अभावामुळेही प्रश्न निर्माण होत असल्याने यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली.
या वेळी बिम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी सांगितले की, मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बऱ्याच वेळा इतरत्र उपचार घेतल्यानंतर रुग्णांना ऐनवेळी गंभीर अवस्थेत बिम्समध्ये दाखल करण्यात येते, त्यामुळे उपचार प्रभावी ठरत नाहीत. तसेच, काहीवेळा तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपलब्धता आणि सुविधा अपुरी असल्यानेही समस्या उद्भवतात. याबाबत शासनाला माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत माजी नगरसेवकांनी अंगणवाडी व आशा सेविकांना अधिक सक्रिय करून गरोदर महिलांच्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, बिम्स प्रशासनाने आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करून रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीदेखील करण्यात आली.
माजी महापौर विजय मोरे यांनी बीम्स रुग्णालयातील आपत्कालीन विभागाचा दूरध्वनी बंद असतो या विषयावर लक्ष वेधून सदर सुविधा सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच इतर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना शिफारस पत्राची गरज असते त्यावेळी गंभीर अवस्थेत असणाऱ्या रुग्णांना समक्ष घेऊन येण्याची सूचना केली जाते, अशा सूचना अयोग्य असून यासाठी विशेष डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बिम्सच्या सुधारणांसाठी पुढील टप्प्यात जिल्हा प्रभारी मंत्र्यांना भेटून आवश्यक सुविधा वाढवण्याची मागणी करण्यात येईल, असेही माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले. या वेळी माजी महापौर विजय मोरे, सरीता पाटील, रेणु किल्लेकर, सतीश गौरगोंडा,माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, ॲड. निर्वाणी, दीपक वाघेला जयश्री माळगी ,नेताजी जाधव, शिवनगौडा पाटील, सादिक इनामदार आदी उपस्थित होते.