बेळगाव लाईव्ह :शाळेतील आपली दप्तरे आणली नाहीत या क्षुल्लक कारणावरून गोकाक शहरातील सरकारी हायस्कूलच्या शेजारी असलेल्या वाल्मिकी मैदानावर तीन विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्यावर चक्क चाकू हल्ला करून त्याला जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली.
चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नांव प्रदीप बंडीवड्डर असे आहे. काल गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या प्रदीप बंडीवड्डर याला त्याच शाळेत दहावीत शिकणारे त्याचे वर्गमित्र रवी चिन्नवा, अशोक कंकणवाडी, सिद्धार्थ मत्तीकोप्प यांनी शाळेत ठेवलेले त्यांचे दप्तर आणण्यास सांगितले. मात्र प्रदीप याने त्यांचे दप्तर आणण्यास नकार दिल्याने तिघांनी त्याच्या मानेवर, हातावर व पोटावर चाकूने वार करून पळ काढला.
सदर हल्ल्यात जखमी होऊन प्रदीप बंडीवड्डर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. सदर प्रकार निदर्शनास येताच शाळेच्या शिक्षकांनी प्रदीप याला उपचारासाठी तातडीने गोकाकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमी प्रदीप याला अधिक उपचारासाठी शहरातील खासगी गंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या चाकू हल्ल्याची माहिती मिळताच गोकाक शहर पोलीस रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी पीडितेकडून माहिती गोळा केली. हल्लेखोर विद्यार्थी आणि जखमी विद्यार्थी हे एकाच शाळेतील दहावीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.