बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथे येत्या मंगळवारी 21 जानेवारी होणाऱ्या ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे दोन लाखांहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव विमानतळावर आज गुरुवारी मंत्री जारकीहोळी पत्रकारांची बोलत होते. हा कार्यक्रम गांधी भारत कार्यक्रमाचा एक भाग असून महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीच्या स्मरणार्थ आहे. हे अधिवेशन बेळगाव क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर होणार आहे.
या अधिवेशनाला एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. सुरुवातीला पुढे ढकलण्यात आलेला हा कार्यक्रम आता नियोजनाप्रमाणे आयोजित केला जाईल.
सदर सरकार-आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी 21 रोजी सकाळी 10:30 वाजता सुवर्ण विधान सौध प्रांगणात महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण करण्याद्वारे होणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे.
या अधिवेशना संदर्भात एआयसीसी सरचिटणीस आणि राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला शनिवारी बेळगाव आणि चिक्कोडी जिल्ह्यांचा दौरा करून स्थानिक नेत्यांसोबत तयारीच्या बैठका घेत आहेत. त्यानंतर सुरजेवाला अधिवेशनाच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जातील, अशी माहितीही जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढे दिली.