बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आणि जेष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल यांचा जीव वाचवण्यासाठी राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील विविध शेतकरी, कामगार, विद्यार्थी, दलित आणि महिला संघटनांच्या वतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी-विरोधी धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चा आणि अन्य संघटनांनी मिळून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर 70 वर्षीय ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल हे 48 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत.
त्यांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक झाली असून, शरीरातील मांस पेशींचा क्षय, रक्तदाबाचा घट यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर संकट निर्माण होऊ शकते. केंद्र सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे आज शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. दिल्लीतील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने काळ्या कृषी कायद्यांना रद्द केले असले तरी, शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शेतकऱ्यांच्या सर्व उत्पादनांना किमान आधारभूत किंमतीची हमी देणारा कायदा तातडीने लागू करावा. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. विद्युत पंपांचे मीटर लावण्याचा आदेश रद्द करावा तसेच विद्युत क्षेत्राचे खासगीकरण थांबवावे. 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक 5000 पेन्शनची तरतूद करावी.
ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या वेळी दिलेल्या सर्व लेखी आश्वासनांची पूर्तता करावी. कृषी उत्पादन बाजार समितीच्या (APMC) नियमनाला धक्का पोहोचवणारी धोरणे रद्द करावीत. दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने दिलेली वचने, शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी आणि शेती व्यवसाय टिकवण्यासाठी केंद्राने काळ्या कृषी कायद्यांना रद्द केले, मात्र अन्य महत्त्वाच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत.
राज्यभरातील शेतकरी, कामगार, दलित संघटना आणि महिला संघटनांनी एकत्र येऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तत्काळ राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारलाही या विषयात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने जर त्वरित पावले उचलली नाहीत तर हा प्रश्न आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.