बेळगाव लाईव्ह :नव्या संकल्पांसह बेळगाव शहरवासीयांकडून काल 31 डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत नववर्षाचा आनंद साजरा करण्याबरोबरच मध्यरात्री 12 च्या ठोक्याला ओल्ड मॅन प्रतिकृतींचे दहन करून फटाक्यांची आतषबाजीसह संगीत नृत्याच्या तालावर ठेका धरत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
बेळगाव शहरात ठिकठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने काल सकाळपासून सर्वत्र ‘थर्टी फर्स्ट’चा फीवर दिसत होता. शहरातील चिकन व मटन शॉप समोर नेहमीपेक्षा ग्राहकांची जास्त गर्दी दिसत होती.
काही ठिकाणी तर मटन -चिकन खरेदीसाठी लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत होत्या. शहरवासीयांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सहकुटुंब थर्टी फर्स्टचा आनंद लुटला. नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच हॉटेल्स, रिसॉर्ट, धाबा एवढेच नाही तर अगदी शेतात सुद्धा तरुणाईने पार्टी करून जुन्या वर्षाला निरोप दिला. काल सायंकाळपासूनच शहर उपनगरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नववर्ष साजरे करण्यासाठी नागरिक व तरुणाईची गर्दी होताना पहावयास मिळत होती. त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंट चालकांचा धंदा काल तेजीत होता. शहरात मध्यरात्री 12 च्या ठोक्याला ओल्ड मॅन प्रतिकृतीच्या प्रतिकृतींच्या स्वरूपात समाजातील वाईट प्रवृत्तींचे दहन करून फटाक्यांच्या आतषबाजीत सर्वांनी एकमेकांना हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या.
बेळगाव शहरात विशेष करून कॅम्प भागामध्ये ओल्ड मॅनच्या प्रतिकृतीचे दहन करून डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसत होती. कॅम्पातील सुमारे 20 -25 फुट उंचीचा भव्य ओल्ड मॅन यंदा सर्वांचे आकर्षण ठरला होता. त्यामुळे या ओल्डमॅनच्या दहनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांसह युवक युवतींनी परिसरात तोबा गर्दी केली होती.
सदर भव्य ओल्ड मॅन प्रतिकृतीचे रात्री 12 वाजता दहन करून उपस्थितांनी नववर्षाचे जल्लोषी स्वागत केले. ओल्ड मॅन दहनाचा आनंद लुटण्यासाठी कॅम्प परिसरात आपल्या वडीलधाऱ्यांसोबत चिमुकल्यांची देखील गर्दी पहावयास मिळत होती.