बेळगाव लाईव्ह :मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता बेळगाव शहरातील हुतात्मा चौक येथे हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सीमावासियांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केले आहे.
हुतात्मा दिनासंदर्भात आज गुरुवारी सकाळी बेळगाव लाईव्हशी बोलताना त्यांनी उपरोक्त आवाहन केले. माजी महापौर अष्टेकर यांनी म्हणाले की, भाषावार प्रांत रचना करण्यासाठी नेमलेल्या आयोगाने 1956 मध्ये केंद्र सरकारला आपला अहवाल सादर केला. सदर अहवाल स्वीकारण्याचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जाहीर केल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यात तसेच कारवार, बेळगाव, बिदर वगैरे सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
परिणामी बेळगावमध्ये 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारामध्ये पैलवान मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारागडी आणि निपाणीमध्ये कमळाबाई मोहिते असे 5 जण हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनाचे आयोजन केले जाते.
यावेळी उद्या 17 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता हुतात्मा चौक रामदेव गल्ली या भागामध्ये हुतात्म्यांना वंदन करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व जनसमुदाय मिरवणुकीने रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड या भागामध्ये फिरवून हुतात्म्यांबद्दलचा आपला आदर व्यक्त करेल. तरी या कार्यक्रमांमध्ये सीमा भागातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी जाहीर विनंती माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने केली.
बेळगाव शहरातील हुतात्मा दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 11 वाजता समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सीमावसीयांनी बर्डे पेट्रोल पंप येथे जमून मिरवणुकीने कोल्हापूर कडे प्रस्थान करावयाचे आहे. कोल्हापूर येथे तेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे कार्यक्रम हाती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाईल. त्यानंतर कोल्हापूर मधील हुतात्मा अभिवादनाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. अशी माहिती देऊन तरी समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर बर्डे पेट्रोल पंप येथे जमावे. ज्यांना वेळेत पोहोचणे शक्य नसेल त्यांनी दुपारी 3 च्या आत थेट कोल्हापूर गाठावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र सरकारचे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाचा जो खटला प्रलंबित आहे तो लवकरात लवकर निकालात निघावा यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांकरवी आम्ही महाराष्ट्र सरकारला निवेदन धाडणार आहोत. या निवेदनाद्वारे सीमा प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करून सीमा भागातील मराठी जनतेला न्याय द्यावा अशी विनंती महाराष्ट्र सरकारला केली जाणार आहे, अशी माहिती शेवटी सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी दिली.