बेळगाव लाईव्ह :जामीन मिळवण्यासाठी आवश्यक निधी मिळत नसल्यामुळे कारागृहात खितपत पडलेल्या एका महिलेची अखेर सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे सुटका झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
जामिनासाठी निधी उपलब्ध झाल्याने कारागृहातून सुटका झालेल्या महिलेचे नांव लक्ष्मी तलवार असे आहे. सदर महिलेच्या सुटकेसाठी ॲड. विद्या कोटी यांनी सुरुवातीला आवश्यक रकमेच्या अर्ध्या रकमेची व्यवस्था करून मदत केली होती. तथापि उर्वरित रकमेची व्यवस्था होणे बाकी होते.
ही बिकट परिस्थिती ओळखून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक कृष्णमूर्ती, एएसटी अधीक्षक मलिकार्जुन कोन्नूर व इतर कर्मचाऱ्यांनी सदर बाब सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
या संदर्भात बोलताना विजय मोरे यांनी मदनकुमार भैरप्पनवर आणि प्रसन्न घोटगे यांनी दिलेल्या पाठिंबामुळे निधी जमवणे शक्य झाल्याचे सांगून त्या दोघांचे आभार मानले. मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदनकुमार भैरप्पानावर आणि प्रसन्न घोटगे यांच्या मदतीने झपाट्याने संसाधने गोळा केली. त्यांचे एकत्रित प्रयत्न लक्ष्मी तलवार हिच्या जामिनाची आवश्यकता पूर्ण करू शकले आणि तिचे स्वातंत्र्य तिला परत मिळवून देऊ शकले.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून आज बुधवारी सकाळी लक्ष्मी तलवार हिची सुटका करण्यात आली. कारागृहाबाहेर येताच लक्ष्मी तलवार हिने सर्वप्रथम विजय मोरे, मदनकुमार भैरप्पानावर व ॲड. विद्या कोटी यांच्या पाया पडून कृतज्ञता व्यक्त केली.
लक्ष्मीच्या कारागृहातील सुटकेप्रसंगी नंदू पीव्हीजी, ॲलन विजय मोरे, अद्वैत चव्हाण पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या समर्पणावर प्रकाश टाकला. हा सामूहिक प्रयत्न सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकतेचे महत्त्व अधोरेखित करतो.