बेळगाव लाईव्ह :उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला असताना बेळगाव शहरांमध्ये येत्या गुरुवार दि. 16 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील 16 व्या वरिष्ठ पुरुष शरीर सौष्ठव आणि महिला मॉडेल फिजिक स्पर्धेच्या स्वरूपातील देशभरातील मातब्बर स्पर्धकांचा सहभाग असलेल्या शरीर सौष्ठव महाकुंभाला आज मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज देशभरातील 500 स्पर्धकांची नांव व वजन नोंदणी प्रक्रिया पार पडली.
शहरातील सांवगाव रोडवरील अंगडी कॉलेज मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या आयोजन प्रक्रियेला आजपासून भूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे. यासाठी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे (आयबीबीएफ) अध्यक्ष रमेशकुमार, सचिव हिरल सेठ, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक फेडरेशनचे सचिव चेतन पठारे, मिस्टर वर्ल्ड प्रेमचंद डिगरा, मधुकर तळलकर आदी मान्यवरांसह आयबीबीएफ आणि कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी, स्पर्धेचे पंच बेळगावात दाखल झाले आहेत. आयबीबीएफच्या देशभरातील 16 युनिटमधील विविध राज्यांमधील 500 स्पर्धकांची आज मंगळवारी अंगडी कॉलेजच्या विद्यार्थी वस्तीगृहाच्या ठिकाणी नांव व वजन नोंदणी प्रक्रिया पार पाडण्यात आली. यासाठी दाखल झालेल्या विविध राज्यांसह रेल्वे, सेनादल, ऑल इंडिया पोलीस वगैरेच्या संघातील शरीर सौष्ठवपटू स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
स्पर्धकांची नांव व वजन नोंदणी प्रक्रिया अतिशय काटेकोररित्या पार पाडण्यात आली. आता उद्या बुधवारी 15 जानेवारी रोजी सर्व स्पर्धकांचे प्री जजिंग होणार असून त्यातून गुरुवारी होणाऱ्या मुख्य स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड केली जाणार आहे.
बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने आज आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता वर्ल्ड बॉडी बिल्डर्स अँड फिजिक फेडरेशनचे सचिव चेतन पठारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना फेडरेशनच्यावतीने सर्वप्रथम बेळगावमध्ये राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल कर्नाटक राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशन प्रामुख्याने अजित सिद्दन्नावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले. कारण या स्पर्धेच्या आयोजनासाठी ते सर्वजण खूप परिश्रम घेत आहेत असे ते म्हणाले. आनंदाची गोष्ट म्हणजे आयबीबीएफने सुनील आपटेकर यांची या राष्ट्रीय स्पर्धेचे ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून नियुक्ती केली आहे.
सुनील आपटेकर हे बेळगावचे नाही तर संपूर्ण भारताचे आमचे ब्रँड अँबेसिडर आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून अनेक पदके मिळवली आहेत. बेळगावातील स्पर्धेच्या आयोजनात त्यांचेही मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेचे पुरस्कर्ते सतीश जारकीहोळी यांनी या स्पर्धेसाठी 25 लाख रुपयांची पारितोषिके पुरस्कृत केल्याबद्दल त्यांनाही खूप धन्यवाद. यंदाच्या या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या भारतातील 43 युनिट मधील 500 स्पर्धकांची नांवनोंदणी होणार असून त्यापैकी जवळपास 300 जणांची नोंदणी आज सकाळच्या सत्रात झाली आहे. स्पर्धेसाठी 300 ऑफिशियल्स आले आहेत. एकंदर सुमारे 800 लोकांचे शरीर सौष्ठव महाकुंभ आपण आजपासून बेळगावमध्ये अनुभवणार आहोत.
या स्पर्धेच्या निमित्ताने देशातील यापूर्वीचे मिस्टर इंडिया, मिस्टर वर्ल्ड, मिस्टर युनिव्हर्स किताब विजेते शरीर सौष्ठवपटू बेळगावमध्ये आले आहेत. सदर राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातील शरीर सौष्ठवपटू वर्षभर मेहनत घेत असतात. या स्पर्धेच्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच प्रत्येक राज्यातून फक्त 12 स्पर्धकांची निवड केली जाते मात्र या 12 जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी जवळपास 2000 शरीर सौष्ठवपटू वर्षभर तयारी करत असतात. त्यामुळे येथे आलेल्या सर्व स्पर्धकांचे मी स्वागत करतो असे सांगून सदर राष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याबद्दल चेतन पठारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना धन्यवाद दिले.
वर्ल्ड चॅम्पियन शरीर सौष्ठवपटू पद्मश्री प्रेमचंद डिगरा यांनी यावेळी बोलताना कर्नाटक बॉडी बिल्डर्स असोसिएशनने बेळगावमध्ये या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले ही अतिशय आनंदाची बाब आहे असे सांगितले. आयबीबीएफचे अध्यक्ष रमेश कुमार यांची अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरची ही पहिलीच वरिष्ठ राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा आहे. बेळगावच नाहीतर संपूर्ण हिंदुस्थानातील युवा पिढीला मला संदेश द्यावा सारखा वाटतो की जीवनात मेहनतीला अतिशय महत्त्व आहेच परंतु तुम्ही कधीही व्यसनांच्या नादी लागू नका. शरीर सौष्ठवपटूंनी स्टेरॉईड अर्थात उत्तेजकांचा वापर न करता नैसर्गिक आहार घेऊन सुदृढ रहावे. ज्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन आनंदी होईल प्रत्येक युवकाला मी सांगू इच्छितो की कठीण परिश्रम प्रामाणिकपणा शिस्त आणि राष्ट्रीयत्व त्यांच्यामध्ये असले पाहिजे. स्वतःसाठी आपल्या कुटुंबीयांसाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो, असे डिगरा यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर बेळगावचे मि. इंडिया सुनील आपटेकर हे स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती देताना म्हणाले की, बेळगावात होणाऱ्या पुरुष व महिलांसाठीच्या 16 व्या वरिष्ठ राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातून 43 ते 44 संघ आले आहेत. यामध्ये प्रत्येक राज्यांच्या संघासह रेल्वे, ऑल इंडिया पोलिस, सेनादल, आयकर खाते वगैरे संघांचा यामध्ये समावेश आहे शरीर सौष्ठव महासंघाचे सचिव चेतन पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रात जवळपास 300 शरीर सौष्ठवपटूंची नोंदणी झाली आहे. आज मंगळवारी सर्व स्पर्धकांची नोंदणी व वजन तपासणी होणार असून उद्या बुधवारी 15 जानेवारी रोजी पूर्व चांचणी (प्री जजिंग) होणार आहे. त्यामध्ये स्पर्धेच्या विविध 10 गटांसाठी प्रत्येक संघातून दहा स्पर्धकांची निवड केली जाईल, जे गुरुवारी 16 जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्य अंतिम स्पर्धेत भाग घेतील.
या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटातील पहिल्या 5 क्रमांकाच्या स्पर्धकांची निवड केली जाईल. या पाच स्पर्धकांमधील प्रत्येक गटातील जे प्रथम क्रमांकाचे स्पर्धक असतील त्यांच्यामधून राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब विजेत्या स्पर्धकाची निवड केली जाणार आहे. विजेत्या स्पर्धकाला 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि मला वाटतं जगात कोणत्याही शरीर सौष्टवपटूला मिळालेला नाही इतका भव्य आकर्षक करंडक बक्षीसा दाखल दिला जाणार आहे.
देशभरातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंच्या खानपान -आहार व्यवस्थेबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, शरीर सौष्टवपटुंसाठी त्यांचा आहार अतिशय महत्त्वाचा असतो. आम्ही जेव्हा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा करायचो त्यावेळचा आहाराच्या बाबतीतील आमचा अनुभव तितकासा चांगला नव्हता. तथापि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या स्वरूपात बेळगावच्या शरीर सौष्ठव क्षेत्राला एक वरदान लाभले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मि. सतीश शुगर सारखी स्पर्धा सुरू करणाऱ्या जारकीहोळी यांनी या स्पर्धेसाठी घसघशीत 30 लाख रुपयांचे घसघशीत पारितोषिक पुरस्कृत केले आहे. त्याचप्रमाणे देशभरातून येणाऱ्या स्पर्धकांची शरीर सौष्टवपटुंसाठी उकडलेले चिकन, उकडलेली अंडी, सॅलेड, फळफळामुळे यासारख्या आवश्यक आहाराची स्वतंत्र अशी उत्तम व्यवस्था केली आहे, असे आपटेकर यांनी सांगितले.