बेळगाव लाईव्ह :विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी काही तास शिल्लक राहिले असून रविवारी विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. कादर यांनी सुवर्णसौधला भेट देऊन पाहणी केली.
अध्यक्ष कादर यांनी तळमजल्यावरील मंत्र्यांच्या खोलीच्या कॉरिडॉरमधून फिरून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बालक मोहनदास ते महात्मा ही थीम ठेऊन महात्मा गांधींच्या जीवनकथेची साकारलेली 100 विशेष छायाचित्रे पाहिली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी उद्घाटनासाठी सज्ज असलेल्या अनुभव मंडप या तैलचित्राची पाहणी केली. नंतर त्यांनी विधान सभागृहाची पाहणी केली. वेगळ्या शैलीने त्यांनी नव्याने तयार केलेल्या अध्यक्षांच्या खुर्चीची पाहणी केली.
दरम्यान, त्यांनी विधानसभा सदस्यांची आसन व्यवस्थाही तपासली. महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनच्या शताब्दी वर्षानिमित्त छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन पाहिले.
यावेळी विधानसभेचे सचिव एम. के. विशालाक्षी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते.