बेळगाव लाईव्ह:लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्थापन केलेल्या वॉटर प्लांट अर्थात शुद्ध पेयजल संयंत्रांच्या नावाखाली कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी जनतेच्या कष्टाच्या पैशाची लूट चालवली असून या गैरप्रकाराला तात्काळ आळा घालावा, अशी मागणी कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाच्यावतीने उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले.
लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व गावांमध्ये शुद्ध पेयजल संयंत्रे स्थापन केली आहेत. मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची पैशाची तहान लोकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यापासून वंचित ठेवत असून त्यांनी बंद पडलेले वॉटर प्लांट सक्रिय असल्याची खोटी माहिती देऊन जनतेच्या कष्टाच्या पैशाची लूट चालवली आहे.
त्यामुळे दुर्दैवाने लोकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. हा अक्षम्य गुन्हा असून यासंदर्भात स्थानिक पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तोंडी व लेखी स्वरुपात तक्रार करूनही अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.
पिण्याच्या पाण्याचे युनिट्स आणि वीजबिलाच्या आधारे किती युनिट सुरू झाले किंवा नाहीत, याची शहानिशा करून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या ठेकेदारांवर निर्णायक कारवाई करण्याद्वारे ग्रामीण जनतेचे आरोग्य आणि सरकारी पैशांचे नुकसान रोखावे. शहानिशा केल्याशिवाय कंत्राटदाराची बिले मंजूर केली जाऊ नयेत.
सखोल चौकशी करूनच त्यांना बिलाचे योग्य पैसे द्यावेत. भ्रष्ट कंत्राटदाराला ज्या अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन आहे त्यांच्यावरही कारवाई केली जावी. आहे. काही गैरप्रकार आढळून आल्यास त्यांनी लुटलेला पैसा वसूल करून सरकार जमा करावा.
भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.