बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्नीपथ योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेली अग्निवीरांची तुकडी प्रत्यक्ष सैन्यात जाण्यास सज्ज झाली असून आज थ्री-एमटीआर रेजिमेन्ट, सांबरा येथे झालेल्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यात दाखल होणाऱ्या जवानांचा दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला. दीक्षांत सोहळ्यात ब्रिगेडियर अरविंदरसिंग सहानी यांनी या जवानांना दीक्षा दिली.
वायुदल प्रशिक्षण केंद्र, बेळगाव येथे 30 नोव्हेंबर 2024 रोजी अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींचा भव्य दीक्षांत सोहळा थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात चौथ्या तुकडीतील 1800 हून अधिक प्रशिक्षणार्थींनी 22 आठवड्यांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी भारतीय वायुदलाच्या कॉलेज ऑफ एअर वॉरचे कमांडंट एअर वाइस मार्शल प्रशांत शरद वडोदकर हे प्रमुख पाहुणे व परिक्षण अधिकारी म्हणून उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थींच्या शिस्तबद्ध व कठोर परिश्रमाचे कौतुक करताना परिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशिक्षणार्थींना विशेष पुरस्कार देण्यात आले. यामध्ये नितीन कुमार यांना ‘सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी’ पुरस्कार, दीपाली यांना ‘सर्वोत्तम जीएसटी’ पुरस्कार, नितीन कुमार यांना ‘सर्वांगीण सर्वोत्तम’ पुरस्कार, तर सुहानी साहू यांना ‘सर्वोत्तम शार्पशूटर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
परिक्षण अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना शिस्त, समर्पण आणि नवनवीन गोष्टी शिकण्याच्या जिद्दीचे महत्त्व समजावून सांगितले. प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशहितासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दीक्षांत सोहळ्याला प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबीयांची उपस्थिती हा एक अभिमानास्पद क्षण होता. परिक्षण अधिकाऱ्यांनी पालकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या युवा योद्ध्यांना घडवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले. याचवेळी वायुदल प्रशिक्षण शाळेचे एअर ऑफिसर कमांडिंग आणि त्यांच्या चमूने या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.