बेळगाव लाईव्ह :देव आणि चमत्कारांवर विश्वास ठेवणाऱ्या कोणालाही देव वाचवू शकतो याची प्रचिती आज गुरुवारी सकाळी आली जेंव्हा वाहनांची भरधाव रहदारी असणाऱ्या महामार्गावर चमत्कारिकरित्या उंदराच्या एका पिलाचा जीव वाचला. फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी त्या पिलाला जीवदान दिले.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, संतोष दरेकर यांनी आज सकाळी आपला बालपणीचा मित्र दिनेश कोल्हापुरे सोबत बेळगावच्या बाळेकुंद्री गावातील सद्गुरू श्री पंत बाळेकुंद्री महाराज समाधी मंदिराला भेट दिली. देवाची प्रार्थना करून आणि गुरूंच्या शिकवणीबद्दलची काही पवित्र पुस्तके विकत घेऊन त्यांनी दुचाकीने बेळगावला परतीचा प्रवास सुरू केला.
परतीच्या वाटेवर ते निलजी गावातून जात असताना महामार्गाच्या मध्यभागी त्यांना एक छोटासा उंदीर दिसला. आईच्या मागे जाताना त्याची वाट चुकल्यासारखी वाटत होती. ट्रक आणि कार वेगाने जात असूनही देवाच्या कृपेने उंदराचे ते पिल्लू सुरक्षित होते. ते पाहून दरेकर यांनी ताबडतोब आपली दुचाकी थांबवून हातमोजे घातले (जे नियमितपणे ते प्राणी आणि पक्ष्यांना वाचवण्यासाठी स्वतःसोबत ठेवतात) आणि त्या पिलाला वाचवण्यासाठी धाव घेतली.
तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबून रस्त्याच्या मध्यभागी जाऊन डोळे नीट उघडलेलेही नसलेल्या उंदराच्या त्या बाळाला काळजीपूर्वक उचलून जवळच्या झुडपात सुरक्षितपणे ठेवले.
त्यानंतर बोलताना दरेकर यांनी मला आनंदाची आणि तृप्तीची तीव्र भावना जाणवली, जणू काहीं माझे सद्गुरु श्री पंत बाळेकुंद्री महाराज यांनी मला आज अनपेक्षितपणे समाधी मंदिरात बोलावले होते, केवळ प्रार्थना करण्यासाठी नाही तर एक जीव वाचवण्यासाठी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.