बेळगाव लाईव्ह :सुळेभावी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील झाडीमध्ये प्लास्टिकच्या खोपटात सुजलेल्या आणि जखमी चेहऱ्याने बेशुद्धावस्थेत सापडलेल्या एकाकी वृद्ध महिलेला यंग बेळगाव फाउंडेशन आणि श्री राम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वाचवल्याची घटना आज घडली .
सदर वृद्ध महिला सुळेभावी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील झाडीमध्ये प्लास्टिकच्या खोपटात एकटीच राहत होती. दीर्घकाळ तिच्या अन्नपाण्याची सोय करणाऱ्या ग्रामस्थांनी ती अत्यवस्थ असल्याचे असल्याचे पाहून मदतीसाठी यंग बेळगाव फाउंडेशन आणि श्री राम सेना हिंदुस्थानशी संपर्क साधला.
तेंव्हा त्यांनी मारिहाळ सीपीआय कल्याण शेट्टी आणि स्थानिक हवालदार यांच्या मदतीने त्या वृद्धेला योग्य काळजी घेत तातडीने बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले.
सदर बचाव कार्यात ग्रामपंचायत अध्यक्ष रुद्रप्पा, सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, नरू निलजकर, अवधूत तुडवेकर, मोहन, सोनिया फ्रान्सिस, चेरिल विजय मोरे, अद्वैत चव्हाण-पाटील, संदीप सोमनत्ती, रुग्णवाहिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली.
दयाळूपणाची ही सामूहिक कृती समाजातील सर्वात असुरक्षित सदस्यांची काळजी घेण्याची शक्ती प्रतिबिंबित करते.