बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये सरदार हायस्कूल मैदानावर आयोजित स्व-सहाय्य संघ निर्मित वस्तू आणि खादी उत्पादनांच्या भव्य विक्री प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अवघ्या चार दिवसात 1 कोटी 4 लाख रुपये किमतीच्या वस्तूंची विक्री झाली आहे, अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ यांनी दिली.
शहरातील प्रदर्शन स्थळी आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार सेठ म्हणाले की, 1924 मध्ये बेळगावमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते.
या अधिवेशनाचा शताब्दी सोहळा 26 व 27 डिसेंबर 2024 रोजी करण्याचे ठरले आणि त्या अनुषंगाने स्व-सहाय्य संघाच्या महिलांना व स्थानिक पातळीवरील उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
तेंव्हा या प्रदर्शनातील वस्तूंची खरेदी करून बेळगावकरांनी महिलांना प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी सांगितले. प्रदर्शनातील खादीच्या उत्पादनांना सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उत्पादकांपासून थेट ग्राहकापर्यंत ही संकल्पना या प्रदर्शन -विक्री मेळाव्याच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरदार हायस्कूल मैदानावर आयोजित सदर प्रदर्शन सकाळी 10:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. सदर प्रदर्शन वजा विक्री मेळाव्यामध्ये सहभाग असणाऱ्या दीडशेहून अधिक महिला बचत गटांनी आपापले स्टॉल मांडले असून खादी उत्पादनांचे स्टॉल देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
सदर विक्री प्रदर्शना अंतर्गत येत्या 2 व 3 जानेवारी 2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. तेंव्हा बेळगाववासियांनी बहुसंख्येने या विक्री प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार असिफ सेठ यांनी केले. पत्रकार परिषदेस जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्यासह विविध सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.