बेळगाव लाईव्ह : कर्नाटकमधील भाजपमधील अंतर्गत वादामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा सुरू आहे. आमदार रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर ताशेरे ओढत, त्यांच्याकडे हे पद स्वीकारण्याची क्षमता नाही, असे म्हटले आहे.
आमदार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत विजयेंद्र यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, विजयेंद्र हे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास सक्षम नाहीत. आम्ही यत्नाळ यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत, असे ते म्हणाले. आम. जारकीहोळी यांनी भाजपच्या केंद्रीय समितीने विजयेंद्र यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा विषय देखील उचलून धरला.
यत्नाळ यांना नोटीस दोन दिवसांपूर्वी मिळाली. मात्र, आज ती माध्यमांमध्ये आणली जात आहे. विजयेंद्र यांना लगेचच बदलावे लागेल, असे जारकीहोळी यांचे स्पष्ट मत आहे.
यावेळी त्यांनी बी.एस. येडियुरप्पा यांचा उल्लेख केला आणि सांगितले की, बी.एस. येडियुरप्पा हे जन्मजात लढवय्ये आहेत, पण विजयेंद्र त्यांच्यापेक्षा खूपच लहान आहेत.
विजयेंद्र यांचे जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालून फिरण्याचे वय आहे असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला. तसेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत खुल्या बैठकीत चर्चा करून सांगणार असल्याचेही विधान केले. या विधानानंतर आता भाजपमधील वादाची तीव्रता अधिक वाढू शकण्याची चिन्हे आहेत.