बेळगाव लाईव्ह -येथील सर्वात जुन्या असलेल्या दी पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 15 डिसेंबर रोजी होणार आहे. एकंदर 988 पात्र सभासद मतदान करणार असून 13 जागा पैकी चार राखीव गटातून बिनविरोध उमेदवार निवडून आले असल्याने फक्त सामान्य आणि महिला अशा दोन गटात ही निवडणूक होणार आहे.
सोमवार हा उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात अनेकांनी आपले अर्ज मागे घेतल्याने मागासवर्गीय ब गटातून श्रीकांत अनंतराव देसाई हे बिनविरोध निवडून आले आहेत.ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बँकेचे माजी संचालक व माजी महापौर विजय मोरे तसेच दत्ता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले
तसेच ओबीसी (ए )गटातून विद्यमान संचालक गजानन ठोकणेकर व मागासवर्गीय जमाती (एस टी) गटातून विद्यमान संचालक मारुती शीगीहळी हे बिनविरोध निवडून आले आहेत. मागासवर्गीय जाती (एस सी) गटातील चार उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने मल्लेश चौगुले हे बिनविरोध निवडून आले आहेत.
येत्या 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मधून विद्यमान संचालक असलेले सर्वश्री रणजीत चव्हाण पाटील, अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, यल्लाप्पा बेळगावकर व सुहास तराळ हे निवडणूक लढवीत आहेत.
तर त्यांच्या विरोधात अनिल देवगेकर आणि रवी दोडनावर ,महिला गटातून विद्यमान संचालिका सुवर्णा शहापूरकर यांच्यासह अरुणा सुहास काकतकर अष्टेकर यांच्या पॅनल मधून तर पद्मा दोडनवर व लक्ष्मी कानुरकर याविरोधी गटातून निवडणूक लढवीत आहेत. सोमवारी निवडणूक अधिकारी भरतेश शेबनावर यांनी चिन्हे वाटप केली असून उमेदवार तयारीला लागले आहेत.
रविवार दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत बी के मॉडेल हायस्कूल, कॅम्प बेळगाव येथे मतदान होणार आहे.
सामान्य गटातून प्रवीण अष्टेकर, चांगदेव लाड, निहाल शहापूरकर ,मंजुनाथ पाटील, विकास मेणसे, विशाल राऊत, सदानंद सामंत ,संदीप लामजी व ज्ञानेश्वर सायनेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर महिला गटातून स्नेहल राऊत, परिशिष्ट जाती गटातून चेतक कांबळे, विजय मोरे ,विद्याधर कुरणे यांनी अर्ज मागे घेतले आणि परिशिष्ट जमाती गटातून परशुराम शिगीहल्ली आदींनी आपले अर्ज मागे घेतले.
गेल्या पाच वर्षात विद्यमान चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बँकेची उल्लेखनीय प्रगती केली असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहोत असे मत यावेळी बोलताना सर्व उमेदवारांनी व्यक्त केले. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सामान्य गटात सात जागांसाठी नऊ उमेदवार आणि महिला गटात दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसते