बेळगाव लाईव्ह : पंचमसाली समाजावरील लाठीमाराच्या प्रकरणावरून विरोधी पक्ष विधानसभेत आक्रमक झाला आहे. समाजावर झालेल्या लाठीहल्ल्याबाबत सरकारने माफी मागावी, संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात लावून धरली.
गुरुवारी (दि. १२) विधानसभेच्या सकाळच्या कामकाजाला सुरुवात होताच, विरोधकांनी पंचमसाली समाजावरील लाठीहल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणावर तत्काळ चर्चा व्हावी आणि मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यानंतर गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी निवेदन देत आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन केले. त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई अपरिहार्य असल्याचे सांगितले.
गृहमंत्र्यांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. “विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना आणि आंदोलनात आमदार सहभागी झालेल्या स्थितीत आंदोलकांवर लाठीमार करणे हे अत्यंत चुकीचे आहे,” असे मत विरोधकांनी व्यक्त केले. आंदोलक शेतकरी असून, शेतकरी देशाचे अन्नदाता आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांची कठोर भूमिका चुकीची असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी आंदोलन करणाऱ्या पंचमसाली स्वामी मृत्यूंजय यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या टीकेवरही आक्षेप नोंदवला. स्वामी भाजपशी संबंधित असल्याचे सत्ताधारी पक्षाकडून आरोप केले जात आहेत. पण स्वामींनी मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी प्रयत्न केले होते, असे विरोधकांनी सांगितले.
पोलिसांच्या लाठीहल्ल्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि माफी मागावी, आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सरकारवर टीका करत, “या सरकारने पंचमसाली समाजाचा अपमान केला आहे. हा प्रकार निषेधार्ह असून, सरकारला जबाबदार धरण्यात आले पाहिजे,” असे ठामपणे मांडले.
सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. सरकारने पंचमसाली समाजाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्याचे आवाहन विरोधकांनी केले.