बेळगाव लाईव्ह :सीमावासियांचा बुलंद असा महामेळावा सोमवार 9 रोजी बेळगाव येथे घेऊन कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर दिले जाईल. बेळगाव शहरांमध्ये हा महामेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच यासाठी सीमावासीयांनी आपापल्या भागात जनजागृती करून हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजेत. असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची पदाधिकाऱ्यांची बैठक आज कॉलेज रोडवरील समितीच्या कार्यालय संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किनेकर होते.
सहचिटणीस मल्लाप्पा गुरव यांनी प्रास्ताविक केले. मनोहर किनेकर पुढे म्हणाले की २००६ सालापासून बेळगाव मध्ये कर्नाटक सरकार हिवाळी अधिवेशन घेत आहे, या हिवाळी अधिवेशनाला प्रतिउत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमावासियांच्या वतीने महामेळावा घेण्यात येतो. येथे अधिवेशन घेऊन बेळगाव सारख्या वादग्रस्त शहरांमध्ये कर्नाटक सरकारने आपला हक्क ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा व सीमावासियांना न्याय मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. गेली काही वर्षे कर्नाटक शासनाने सीमावासियांना हा महामेळावा घेण्यासाठी अनेक अडचणी करून महामेळावा होत होता, परंतु गेल्या दोन वर्षापासून कर्नाटक सरकारने सीमावासियांचा आवाज दाबण्यासाठी व हा महामेळावा होऊ नये यासाठी अनेक अडचणी निर्माण करित सीमावासियांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.लोकशाही राज्यात प्रत्येकाला आपले आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु सीमाभागात आता मोगलाई सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमाभागात मराठी सीमावासीयांच्या न्याय हक्कावर गदा आणून या ठिकाणी सीमावासीयांच्यावर मोठ्या अन्याय अत्याचार करण्यात येत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हा महामेळावा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला याची पूर्वकल्पना देऊन यासाठी परवानगी मागितली आहे. परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाने याची दखल न घेता हा महामेळावा होऊ नये यासाठीच आपला रेटा पुढे चालवला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी या महामेळाव्याची परवानगी घेण्यासाठी अद्याप पाठपुरावा करीत आहेत,परंतु पोलीस खाते व जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही आहे.बेळगाव शहरांमध्ये कुठल्याही परिस्थितीत हा महामेळावा होणार आहे, यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आर एम चौगुले म्हणाले की महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमावासियांनी लोकशाही मार्गाने आपले आंदोलन करीत आहे.लोकशाही राज्यात प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेने आपले अधिकार दिले आहेत.या अधिकाराची पायमल्ली या ठिकाणी होताना दिसत आहे. लोकशाही राज्यात प्रत्येकाला सर्व प्रकारचे अधिकार आहेत तेव्हा जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन सीमावासियांना महामेळावा घेण्यासाठी सहकार्य करावे.जर सीमावासीयांना हा महामेळावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमावासियांनी हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.तरच सीमाभागात मराठी संस्कृती नांदेल, असे आवाहन केले
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किनेकर, आर एम चौगुले, लक्ष्मण होणगेकर, रामचंद्र मोदगेकर, अँड एम जी पाटील, मल्लाप्पा गुरव, आर के पाटील, बी एस पाटील, मनोहर हुंदरे,अनिल पाटील, राजू किनयेकर,लक्ष्मण पाटील, बाळासाहेब फगरे, मनोहर संताजी,शंकर कोनेरी, उपस्थित होते.