बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बेळगाव सीमाप्रश्नाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकार दरबारी ठोस पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात समितीचे शिष्टमंडळ 17 डिसेंबर रोजी नागपूर येथे दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भातील तातडीच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. याशिवाय समितीने केंद्र सरकारकडे या विषयावर आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.
शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती नेते रमाकांत कोंडुस्कर महादेव पाटील, सागर पाटील आनंद अपटेकर आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागपूरला मुक्कामी आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास परवानगी नाकारून कर्नाटक सरकारने दडपशाही केली आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी समितीचे शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे आणि पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र येऊन गृहमंत्री आणि पंतप्रधानांची भेट घ्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांना सीमा प्रश्नाची जाण करून देण्याचा प्रयत्न या नागपूर दौऱ्यात केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे
या आंदोलनात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी नागपूर अधिवेशनात सहभागी होण्यासाठी समितीशी संपर्क साधावा, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी सागर पाटील 9964777565, 9481535528, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.