Monday, December 23, 2024

/

बँकेत सत्तेवर येताच काय म्हणाले विद्यमान अध्यक्ष दिगंबर पवार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल चा फक्त एक उमेदवार वगळता अन्य सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल पॅनलचे प्रमुख बँकेचे मावळते चेअरमन दिगंबर पवार यांनी बँकेच्या समस्त सभासद मतदारांचे सर्व विजयी उमेदवारांच्यावतीने जाहीर आभार मानले आहेत.

निवडणूक स्थळी काल रविवारी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिगंबर पवार यांनी उपरोक्त आभार प्रदर्शन केले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मराठा बँकेचे मावळते चेअरमन पवार यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल बँकेच्या सर्व सभासदांचे आभार मानले.

प्रचारादरम्यान आम्ही काही ठिकाणी पोहोचू शकलो नाही मात्र तरीही सर्व सभासद बंधू-भगिनींनी इथे येऊन मतदान केले त्याबद्दल मी आभारी आहे असे सांगून ते म्हणाले की संचालक मंडळाची ही निवडणूक अत्यंत शांततेने यशस्वीरित्या उत्तमपणे पार पडली. आमच्या पॅनल मधील फक्त एक उमेदवार वगळता उर्वरित सर्वजण बहुमताने निवडून आले. या सर्वांचे मी अभिनंदन करतो. या पद्धतीने पुढील 5 वर्षे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व विजयी उमेदवारांच्यावतीने सभासद मतदारांचे आभार मानतो. येत्या 5 वर्षात 500 कोटींचा टप्पा आम्ही नक्कीच गाठू ही माझी सभासद बांधवांना ग्वाही देतो असे ते पुढे म्हणाले.

मराठा बँकेबद्दल बऱ्याच अफवा उठवण्यात आल्या, वाद निर्माण झाले. अशा प्रकारांना आम्ही पुढील 5 वर्षात वाव देणार नाही. बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कांही प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आमच्या बँकेबद्दल अफवा पसरवण्यात आल्या होत्या. या ठिकाणचे प्रोसिडिंग अर्थात कामकाज व्यवस्थित होत नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र आम्ही बँक बँकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज व्यवस्थित चालवत आहोत. कामकाजाची लेखी नोंद झाल्यानंतर उपस्थित संचालकांची त्यावर स्वाक्षरी घेतली जाते.Digambar pawar

सभेचे कामकाज हे कार्यक्रम पत्रिकेनुसार चालते. यावेळी कांही अपवाद वगळता सर्व ठराव एकमताने संमत केले जातात. जे अपवादात्मक ठराव असतील त्यावर नंतर चर्चा केली जाते. त्याला विरोध करणाऱ्यांचे मत जाणून घेतले जाते. त्यानंतर पुढील सभेमध्ये जी कार्यक्रमात पत्रिका लिहिलेली असते सभेपूर्वी त्या पत्रिकेच्या पुष्टीकरणासाठी सर्व संचालक हजर असतात. त्यामुळे बँकेच्या कामकाजाबद्दल ग्राहक व सभासद बांधवांसह जनतेने गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. मराठा बँक ही बहुजन समाजाची बँक आहे.

या समाजातील तळागाळातील लोकांनी आमच्या बँकेचा उत्कर्ष साधण्यासाठी मोठा हातभार लावला आहे, असे स्पष्ट करून आपण निवडून आलेल्या संचालकांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून संस्थेसाठी कार्य करूया, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकारी कायद्यामुळे ज्यांना मतदानाचा हक्क मिळाला नाही त्यांना मी दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यात अशी चूक घडणार नाही याची खात्री देतो असे पॅनलचे प्रमुख बँकेचे मावळते चेअरमन दिगंबर पवार यांनी शेवटी सांगितले.

याप्रसंगी सत्ताधारी गटातील बाळाराम पाटील, बाळासाहेब काकतकर, विश्वनाथ हंडे, मोहन बेळगुंदकर, मोहन चौगुले, विनायक होणगेकर, विनोद हंगिरकर, रेणू किल्लेकर लक्ष्मण नाईक, अशोक कांबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.