बेळगाव लाईव्ह:मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावच्या संचालक मंडळाच्या उद्या रविवार दि. 22 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी भेट देणाऱ्या सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांचे शहरातील चव्हाट गल्ली येथे आज सकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. तसेच पॅनलच्या सर्व उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
मराठा बँक संचालक मंडळाच्या उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाच्या पॅनल करिता आज शनिवारी सकाळी शहरातील चव्हाट गल्ली येथील श्री मारुती मंदिरामध्ये प्रचार सभा घेण्यात आली. तत्पूर्वी फटाक्यांच्या आतषबाजीत निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे स्वागत करून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
प्रचार सभेमध्ये प्रारंभी सत्ताधारी पॅनल मधील उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आपले विचार व्यक्त करताना सुनील अष्टेकर, शरद पाटील, मोतेश बारदेस्कर, विजय जाधव वगैरे मान्यवरांनी मराठा बँकेच्या सत्ताधारी कार्यकारणीच्या कार्याची प्रशंसा करून त्यांच्या पॅनलला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांनी दिवंगत अर्जुनराव घोरपडे, शिवाजीराव काकतकर, बाबुराव हंडे व अर्जुनराव हिशोबकर यांचे पुण्यस्मरण करून मराठा बँकेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या प्रगतीची माहिती दिली.
आज बँकेकडे 250 कोटी रुपयांच्या ठेवी असून हे ठेविदारांनी मराठा बँकेवर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे बँकेला दरवर्षी सहा ते सात कोटी नफा होतो, मात्र इतर तरतुदीमुळे आम्हाला 2.50 कोटी रुपयांचा नफा दाखवावा लागतो. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मराठा बँकेच्या माध्यमातूनच मराठा मंदिरची उभारणी झाली आहे, असे काकतकर यांनी सांगितले.
मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठा बँक आणि चव्हाट गल्लीचे पूर्वापार दृढ नाते असल्याचे सांगितले. चव्हाट गल्ली हा मराठा बँकेच्या सत्ताधारी गटाचा बालेकिल्ला ठरली असल्याचे सांगून तेंव्हा येथील मतदारांनी यावेळीही 100 टक्के मतदान करून सत्ताधारी पॅनलला विजयी करावे असे, आवाहन केले. निवडणुकीच्या महिला गटातील उमेदवार माजी उपमहापौर रेणू सुहास किल्लेकर यांनी आपल्या भाषणात मतदारांनी कशा पद्धतीने मतदान करावयाचे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सत्ताधारी पॅनल उमेदवारांच्या निवडणूक चिन्हावर शिक्का मारून त्यांना बहुमताने विजयी करा, अशी विनंती त्यांनी केली.
आजच्या प्रचार सभेचे औचित्य साधून पायोनियर अर्बन बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रचार सभेअंती मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बँकेच्या मतदार बंधू-भगिनींनी सत्ताधारी पॅनलला आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. प्रचार सभेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी चव्हाट गल्लीतील घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या.
यावेळी बेळगावला आयुष्य बोलताना मराठा बँकेचे संचालक सुनील अष्टेकर म्हणाले की, मी गेली 10 वर्षे संचालक होतो. या कालावधीत मला माझ्या ज्येष्ठांसह सर्व सभासद कर्मचारी वर्ग इतर संचालक आणि समाजातील इतर लोकांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नव्या नव्या होतकरू चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी यावेळी मी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बँकेला खर्च पडू नये, त्याच पैशाचा सभासद अथवा आपल्या समाजासाठी विनियोग करता यावा यासाठी आम्हाला तडजोड करून संचालक मंडळ बिनविरोध करायचे होते. मात्र अधिकाऱ्यांचे सहकार्य न लाभल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत आहे.
एकंदर ही निवडणूक लादली गेली असल्यामुळे माझी बँकेच्या सर्व सभासदांना विनंती आहे की, माझ्यासह शरद पाटील, मोतेश बारदेस्कर यांना मतदान न करता बँकेच्या सध्याच्या सत्ताधारी पॅनलला भरघोस मतांनी निवडून आणून त्यांना पुन्हा एकदा समाज सेवा करण्याची संधी द्यावी. यावेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतलेल्या शरद पाटील आणि बारदेस्कर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. या उभयतांनी देखील सत्ताधारी पॅनलला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.