बेळगाव लाईव्ह : तत्कालीन पिरनवाडी ग्रामपंचायतचे पट्टणपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर पिरनवाडी पट्टन पंचायतीत विकासकार्य देखील सुरू आहेत. मात्र बहुतांश शेती व्यवसाय असलेल्या बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबे रहात असलेल्या या गावकऱ्यांवर कराचा अधिक भार पडू नये यासाठी पुन्हा या गावाला ग्रामपंचायत दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
या पट्टन पंचायतीच्या अंतर्गत खादरवाडी गावही येते. खादरवाडी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सरकारकडे पत्र देत प्रस्ताव दिला आहे.
बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी खादरवाडी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.
बेळगाव शहरालगतचे खादरवाडी गाव हा एक महत्त्वाचा शेतकरी समुदाय असलेले खेडे आहे. येथे शेतकरी विविध समस्यांशी झगडत आहेत, येथील लोकसंख्या आणि इतर बाबी लक्षात घेत खादरवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
या प्रस्तावावर शासकीय स्तरावर सकारात्मक चर्चा सुरु असून, लवकरच यासंबंधित निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे खादरवाडीतील विविध समस्या सुटण्यास मदत होईल आणि नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत असून याबाबत लवकरच शासकीय पातळीवर निर्णय जाहीर केला जाण्या संदर्भात हालचाली सुरु आहेत.
गेल्या काही महिन्यापूर्वी पिरवाडी येथील ग्रामस्थांनी देखील आंदोलन करत कार्यकारी अधिकाऱ्यांच् मनमानीला कंटाळात पट्टणपंचायत ऐवजी पुन्हा ग्रामपंचायत करा अशी मागणी केली होती. एकीकडे पिरनवाडी ग्रामस्थांची देखील ग्रामपंचायत करण्याची मागणी असताना सध्या खादरवाडी बद्दल हा निर्णय घेतला जाणार आहे. पिरनवाडीचे काय होणार याची देखील उत्सुकता सर्वांना लागली आहे.