बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. पंचायत कार्यालयांतील अकार्यक्षमता आणि पीडीओंविरोधातील नाराजी व्यक्त करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या समस्यांचे समाधान होण्यासाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. आज आंबेवाडी ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेनंतर सर्व सदस्यांनी सामूहिक राजीनामा पीडीओ, अधिकारी आणि सचिवांकडे सुपूर्द केला.
पीडिओसह पंचायत अधिकारी अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवत राजीनामा देण्यात आला असून पंचायत अधिकाऱ्यांना शासकीय कामे लावल्याने ग्रामस्थांची कामे होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे आंबेवाडी ग्रामपंचायत हादरली असून सेक्रेटरीसह पीडीओ आणि अन्य अधिकाऱ्यांची मनमानी होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
यापूर्वी 7 ते 9 पीडीओ बदलले आहेत, तरीही ग्रामस्थांच्या समस्यांवर प्रगती होत नाही. सदस्यांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायतीतील अधिकारी आणि सेक्रेटरी यांच्याकडून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळत नाही.
प्रत्येक बैठकीवेळी नागरिक आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे घेऊन येतात. मात्र नागरिकांना कारणे देत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, टाळाटाळ करण्यात येते. यामुळे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ खंडित होऊन, सार्वजनिक कामे अडवली जात असल्याचाही आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
सामूहिक राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी, सर्वसाधारण सभा घेऊन, अधिकारी आणि सेक्रेटरींच्या सहकार्याशिवाय ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू ठेवणे अशक्य आहे, असे स्पष्ट केले आहे.
नागरिकांसमोर येणाऱ्या समस्यांचे समाधान करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, आणि त्यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यात निष्क्रीयपणा दाखवला आहे. ग्रामस्थांची समस्या सोडविणे तर दूरच, अधिकारी आणि सेक्रेटरी सरकारी कामांची कारणे देऊन त्यांच्या समस्या टाळतात, त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. सरकारी कामांसाठी शंभर कारणे देण्यात येत असून, ते कोणत्याही प्रकारे कामकाजात कार्यक्षमतेने पुढे जात नाहीत, असाही आरोप करण्यात आला आहे.
आंबेवाडी ग्रामपंचायतीतील या सामूहिक राजीनाम्याने गावातील राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर मोठा प्रश्न निर्माण केला आहे. संबंधित अधिकारी यावर कोणती कार्यवाही करतील, आणि यावर कोणती भूमिका घेतली जाईल, हे पाहावे लागेल.