बेळगाव : जिल्हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे काल एका आठ महिन्याच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना घडली आणि गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर झाल्यामुळे अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असता आज सदर महिलेचाही मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे.
आठ महिन्याची गर्भवती असलेली राधिका गड्डीहोळी अस्वस्थ झाली होती. कुटुंबीयांनी लगेचच राधिकाला बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी रुग्णालयात नेले.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना बेळगाव येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. नंतर उपचारासाठी बिम्समध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सदर महिलेला हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचाराविना राधिकाचाही मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच पती मल्लेश (25) याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर देखील किम्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.