बेळगाव लाईव्ह : रेल्वे ओव्हरब्रिज आणि कपिलेश्वर मंदिर परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे.
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे ओव्हरब्रिजजवळ आणि कपिलेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत.
नागरिकांनी या समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कपिलेश्वर मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, कचऱ्यामुळे मंदिराच्या आसपास अस्वच्छता पसरली आहे.
शिवाय रेल्वे ओव्हरब्रिजजवळ कचऱ्याचा ढिगारा साचल्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि अन्य साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात साचलेला कचरा तातडीने हटवावा आणि या भागात स्वच्छतेची उपाययोजना करावी.
सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देऊन, योग्य पद्धतीने कचऱ्याचा निपटारा करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.