बेळगाव लाईव्ह :कर्नाटकात शेतकऱ्यांनी सत्तेवर आणलेल्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून याची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी कर्नाटक राज्य नांगरधारी शेतकरी संघटनेच्यावतीने आज बुधवारी सकाळी अलारवाड रस्त्यावरून सुवर्ण विधानसौध येथील आंदोलन स्थळापर्यंत मोर्चाने जाऊन धरणे सत्याग्रह करण्यात आला.
शेतकऱ्यांना मारक ठरणारे तीनही कृषी कायदे रद्द करा, स्वामीनाथन आयोग अंमलात आणा, ऊसाला 4500 रु. भाव द्या, विद्युत खासगीकरण थांबवा, बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द करा, बळ्ळारी नाला साफ करुन परिसरातील शेतकऱ्यांना वाचवा,
गेल्या वर्षीपेक्षा भाताला 1500 ते 2000 रु. भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी भाव वाढ करून सरकारने भात, सोयाबिन इतर खरेदी केंद्र स्थापन करावीत यासह शेतकऱ्यांना मारक ठरणारे अन्य अटी नियम रद्द करून कर्नाटकात शेतकऱ्यांनी सत्तेवर बसवलेल्या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
सरकारने तात्काळ या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा खुर्ची खाली करावी अशी मागणी राज्य नांगरधारी शेतकरी संघटनेतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. यासाठी अलारवाड रस्त्यापासून आंदोलन स्थळी मंडप क्र. 6 पर्यंत स्त्री -पुरुष शेतकऱ्यांनी मोर्चाने जोरदार निदर्शने करत जाऊन धरणे सत्याग्रह केला.
या आंदोलनात राज्य नांगरधारी शेतकरी संघटना अध्यक्ष रवी पाटील, सचिव कल्लाप्पा रपाटी यांच्यासह सर्व जिल्ह्यातील संघटनेचे शेतकरी नेते, कार्यकर्ते, महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.