बेळगाव लाईव्ह : हलगा – मच्छे बायपास संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि हलगा – मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली होती. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत बायपासबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले, आज जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हलगा – मच्छे बायपास प्रकरणी सविस्तर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. बायपासचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच कंत्राटदारांची बैठक बोलावून आपण चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असून शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. बायपास प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
झिरो पॉईंट निश्चित करून कोणत्याही रस्त्याचे कामकाज करण्याचे आदेश असूनही अधिकारी आदेश आणि नियम धाब्यावर बसवत असून शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मिळाला नाही तर हिवाळी अधिवेशनादरम्यान उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.
शेतकरी नेते राजू मरवे यासंदर्भात बोलताना म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांची बायपासमधील शेतकऱ्यांच्यासमवेत झालेली बैठक अत्यंत म्हातवपूर्ण होती. बायपासप्रकरणी आपण जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयाचे आदेश डावलून शेतकऱ्यांवर अन्याय केले आहेत. येथील शेतकरी अल्पभूधारक असून बायपास संदर्भातील गैरप्रकार थांबवावेत अन्यथा येत्या काळात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने याप्रकरणी लक्ष घालून बायपास रद्द करावा अशीही मागणी त्यांनी केली.
शेतकरी नेते प्रकाश नायक बोलताना म्हणाले, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, परंतु कायदा, न्याय आणि आदेशाचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना वेठीला धरण्यात येत आहे, या विरोधात आम्ही आहोत. बायपासप्रकरणी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली, तसेच आत्मीयतेने या विषयावर चर्चा केली, याचे आपल्याला समाधान आहे. बायपास रद्द करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बायपासमधील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. बायपास संदर्भात सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येणार असून याबाबत सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पाऊल उचलले आहे.
तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सबुरीने घेण्याची सूचना केली असून आता बायपासप्रकरणी जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीत शेतकरी नेते राजू मर्वे यांच्यासह हलगा मच्छे बायपास मधील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेत सहभागी होत समस्या मांडल्या.