बेळगाव लाईव्ह : सैन्यदलात सेवा बजाविलेल्या माजी सैनिकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान येत्या १२ डिसेंबर रोजी आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बसप्पा तळवार यांनी दिली.
आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त माहिती दिली असून माजी सैनिकांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, यासाठी सदर आंदोलनाची तयारी सुरु असल्याचे ते म्हणाले.
माजी सैनिकांच्या मुलांना शाळांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली, मात्र अद्याप सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच, निवृत्तीपूर्वी सैनिकांना जमीन देण्याचे आश्वासन सरकारने बजेटमध्ये दिले होते, पण अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही.
तसेच, निवृत्त सैनिकांना त्वरित शासकीय नोकरी उपलब्ध करून द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी एन. कळसण्णवर, शंकर हर्जे, अडिकप्पा मणगुट्टी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, महिला सदस्या आदी उपस्थित होते.