बेळगाव लाईव्ह :आजचा थर्टी फर्स्ट नववर्ष स्वागताच्या उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची जनतेने विशेष करून तरुणाईने दक्षता घ्यावी. आपल्या कुटुंबीयांना काळजीत टाकू नये असे कळकळीचे आवाहन करताना माजी महापौर विजय मोरे यांनी मागील वर्षाप्रमाणे येत्या वर्षातही आपण सकारात्मक कार्य करूया असे सांगून बेळगाव शहरवासियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी महापौर यानात्याने बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून शहरवासीयांना नववर्ष 2025 च्या शुभेच्छा देताना विजय मोरे म्हणाले की, आज 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील युवा पिढीसह सर्व वयोगटातील नागरिक सज्ज झाले आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी ठीकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या 10 वर्षापासून मी रात्री बारानंतर मध्यरात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅच्युलिटी विभागात उपस्थित असतो. याचे कारण म्हणजे विशेष करून उत्साही युवापिढी मद्यप्राशनासह जल्लोषात नववर्षाचे स्वागत करत असते.
दरवर्षी थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या रात्री कांही अपवाद वगळता सर्रास सर्व तरुण मंडळी मद्यधुंद अवस्थेत नववर्षाचा शुभारंभ साजरा करतात. तेंव्हा माझी जनतेला विशेष करून तरुणाईला हात जोडून विनंती आहे बेभान मद्य प्राशन करण्यापूर्वी त्यांनी आपल्या घरात आपले आई-वडील, भाऊ-बहीण, बायको वगैरे कुटुंबीय आपली वाट पाहत आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
त्यांचा विचार करून मागील वर्षी थर्टी फर्स्टला ज्या घटना घडल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. गेल्या वर्षी 31 डिसेंबरच्या रात्री मध्यधुंद अवस्थेत अपघातग्रस्त झालेल्या 7 -8 अतिउत्साही युवकांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न मी व माझे सहकारी माझा मुलगा ॲलन मोरे, गंगाधर पाटील, संतोष ममदापूर वगैरेंनी केला होता.
त्या प्रयत्नांमध्ये आम्ही यशस्वी देखील झालो. दरवर्षी आम्ही सर्वजण रात्री 12 नंतर जाणीवपूर्वक सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅच्युलिटी विभागात मदत कार्यासाठी आवर्जून हजर असतो. विशेष समाधानाची बाब म्हणजे मागील वर्षी अपघातग्रस्त झालेल्या ज्या तरुणांना आम्ही मदत केली ते आपली चूक सुधारत यावेळी रात्री 12 नंतर आमच्यासोबत राहणार आहेत.
तेंव्हा सर्वांनी मर्यादा न ओलांडता नववर्ष स्वागताच्या उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत थर्टी फर्स्ट साजरा करावा. आपल्या कुटुंबीयांना काळजीत टाकू नये असे कळकळीचे आवाहन करताना माजी महापौर विजय मोरे यांनी मागील वर्षाप्रमाणे येत्या वर्षातही आपण सकारात्मक कार्य करूया असे सांगून शहरवासियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.