बेळगाव लाईव्ह : देशभरातील 61 कॅन्टोन्मेंट बोर्ड नागरी वस्तीत विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेत बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संदर्भात अंतिम निर्णयासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
देशातील 61 कॅन्टोन्मेंट बोर्डांचे नागरी वस्तीत विलीनीकरण करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलीनीकरणासाठी हालचालींना वेग आला आहे.
मंगळवारी बेळगाव कॅन्टोन्मेंट कार्यालयातून केंद्रीय कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार, तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर मुखर्जी , पुणे सदर्न कमांडचे अधिकारी, दिल्ली येथील डिफेन्स अधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीत बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नागरी वसाहतीत समावेश करण्यासाठी पंधरा दिवसांत अंतिम अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल तयार केला जाईल. अहवालात महत्त्वाच्या भागांचा समावेश करून विलीनीकरणासाठी योग्य पावले उचलण्यात येतील.
स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, आणि नागरी संस्था यांच्याकडून बंगलो परिसराचाही समावेश करण्याची मागणी केली जात असली तरी मात्र, सैन्य प्रशासनाने या भागाचा समावेश करण्यास नकार दिला आहे. मात्र या संदर्भात एकूणच पंधरा दिवसांनंतर तयार होणाऱ्या अंतिम अहवालावर सर्वांचे लक्ष आहे.
कॅन्टोन्मेंट विलीनीकरणाचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतरच बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरी वसाहतीत समावेशाबाबत अंतिम निर्णय होणार आहे. यामुळे स्थानिक नागरीक आणि प्रशासन दोघांचेही लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.