बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथे 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे रचनात्मक कामकाज सुनिश्चित करण्यासाठी विधान परिषदेच्या सदस्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
मंगळवार आणि बुधवार या दिवशी प्रश्नोत्तर सत्रांनंतर संपूर्ण कित्तूर कल्याण प्रदेशाच्या विकासावर चर्चा करण्याचे नियोजन असल्याचे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले. अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिवाळी अधिवेशनासंदर्भात त्यांनी विस्तृत माहिती दिली.
यंदाच्या अधिवेशनासाठी विधान परिषदेत एकूण 1397 प्रश्न मांडले जातील, यामध्ये 150 तारांकित प्रश्न आणि 81 लक्षवेधी सूचना आहेत. यासोबतच पहिल्या आठवड्यात उत्तर कर्नाटक विकास, म्हादई नदी प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ऊस उत्पादकांच्या समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. मुलांच्या हक्कांचे रक्षण आणि जनजागृतीसाठी विशेष मंच तयार करण्याचे नियोजन आहे. यावर सदस्यांशी चर्चा करून योग्य शिफारसी सरकारकडे देण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
सभागृहात रचनात्मक चर्चा सुनिश्चित करण्यासाठी सदस्यांशी पूर्वचर्चा झाली असून अधिवेशन सुगम व्हावे यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. या अधिवेशनासाठी 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, आमदारांसाठी नवीन निवास प्रकल्प राबवण्याच्या अनुषंगाने ताज ग्रुप आणि केएलई यांसारख्या संस्थांकडून आलेल्या प्रस्तावांवर विचार सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल.
बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा मिळवण्यासाठी येथील 18 आमदारांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास हा दर्जा एका दिवसात मिळवता येईल, असेही होरट्टी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विधान परिषदेच्या सचिव के.आर. महालक्ष्मी, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते.