Monday, December 16, 2024

/

मित्राच्या खुनाच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आर्थिक व्यवहारातून मित्राचा खून केल्याच्या आरोपातून बेळगावच्या नवव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपी विठ्ठल करेप्पा सांबरेकर याची साक्षीदारांमधील विसंगतीसह सरकारी वकिलांना आरोप सिद्ध करण्यात आलेल्या अपयशामुळे निर्दोष मुक्तता केली आहे.

सदर प्रकरणाची माहिती अशी की फिर्यादी वाणीश्री गदगय्या हिरेमठ (वय 28, रा. शिंदोळी) हिने हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात विठ्ठल करिप्पा सांबरेकर (वय 32) याच्या विरोधात आपल्या पतीचा खून केल्याची फिर्याद नोंदवली होती. फिर्यादीमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार वाणीश्री हिचा पती गदगय्या याने आपला मित्र विठ्ठल याच्याकडून 2 लाख रुपये उसने घेतले होते. त्यानंतर पैशाच्या परतफेडसाठी विठ्ठल याने गदगय्या याच्याकडे तगादा लावला होता.

मात्र ज्योतिषी व्यवसाय करणारा गदगय्या पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होता. पैसे वसुलीसाठी गेल्या 26 ऑगस्ट 2022 रोजी आरोपी विठ्ठल हा गदगय्या हिरेमठ याच्या घरी गेला होता. त्यावेळी गदगय्याने आपण कामानिमित्त चेन्नईला जात आहोत आल्यानंतर पैशाचे पाहू असे त्याला सांगितले. तसेच माझी गाडी कोंडसकोप्प येथे ठेवून धारवाड मार्गे मी चेन्नईला जाणार आहे असे गदगय्या याने सांगितले. त्यावेळी आरोपी विठ्ठल याने मला देखील कोंडसकोप्प येथे सोड असे सांगितले. त्यानंतर दोघेही गदगय्या याच्या दुचाकीवरून शिंदोळी येथून कोंडसकोप्पला गेले.

त्याच दिवशी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास गदगय्या याची पत्नी वाणीश्री हिला तुझ्या नवऱ्याचा हालगा येथील तारीहाळ क्रॉस जवळ खून झाला आहे, अशी फोनवरून माहिती मिळाली. तेंव्हा तिने प्रथम घटनास्थळी, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन आपल्या पतीचा मृतदेह पाहिला.

त्यावेळी त्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार झाल्याचे तिला आढळून आले. त्यावरून तिने आपला पती गदगय्याचा खून आरोपी विठ्ठल यांनी केला असल्याची तक्रार हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून कसून चौकशी करण्याद्वारे आरोपी विठ्ठल सांबरेकर याला गेल्या 27 ऑगस्ट 2022 रोजी अटक केली होती. आरोपी विरुद्ध बेळगाव येथील नववे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणाच्या सुनावणी प्रसंगी त्यामध्ये एकूण 13 साक्षीदार 57 कागदपत्रे पुरावे व वीस मुद्देमाल सादर करण्यात आले.

तथापि साक्षीदारांच्या विसंगतीसह सरकारला आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे आरोपी विठ्ठल करेप्पा सांबरेकर याची नववे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिंडलकोप्प शिवपुत्र यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. शंकर बाळनाईक, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. विशाल चौगुले व ॲड. तेरदाळकर यांनी काम पाहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.