बेळगाव लाईव्ह : प्रेमसंबंधांमुळे गोकाक शहरात चांगलाच गोंधळ उडाला आहे. आनंद नावाचा युवक, जो मूळचा बेळगावचा असून सध्या बंगळुरूमध्ये नोकरी करत होता,
त्याचे गोकाकमधील शोभा नावाच्या महिलेबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिप होते. मात्र, या नात्याला वेगळे वळण लागले आणि वाद विकोपाला जाऊन आनंदने शोभावर चाकूने हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल शोभानेही आनंदवर चाकूहल्ला केला.
गोकाक शहरात घडलेल्या या घटनेत शोभाला गंभीर जखम झाली असून तिच्यावर गोकाकमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आनंदला गंभीर अवस्थेत बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोकाकमधील शोभा ही विवाहित असल्याचे आनंदला ठाऊक नव्हते.
दोघांमध्ये फोनवर रोज संभाषण होत असे. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून शोभाचा फोन बंद असल्याने आनंद तिला पाहण्यासाठी बंगळुरूहून गोकाकला आला. त्यावेळी शोभा आपल्या पतीसोबत घरी असल्याचे पाहून आनंदला धक्का बसला.
“माझ्याशी प्रेमसंबंध ठेवून तू दुसऱ्या व्यक्तीशी नाते कसे ठेवू शकतेस?” असा संताप व्यक्त करत आनंदने शोभावर चाकूने हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल शोभाने आत्मरक्षणासाठी आनंदवर चाकूहल्ला केला.
या घटनेची नोंद गोकाक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकारामुळे गोकाकमध्ये खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून हिंसाचाराच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत.