बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढल्याने नागरिक हुडहुडीने त्रस्त झाले आहेत. पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत असून पारा घसरल्यामुळे वातावरण अधिक गारठले आहे. यामुळे उबदार कपड्यांना वाढलेली मागणी बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून थंडीला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यंदा हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. परतीच्या पावसाने ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत थांबण्याचे नाव घेतले नाही, त्यामुळे ऑक्टोबर हिट म्हणावी तशी जाणवली नाही. मात्र, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीने जोर धरला आहे.
सध्या पहाटे आणि रात्री प्रवास करणाऱ्यांना गारठ्याचा तीव्र अनुभव येत आहे. या परिस्थितीत कानटोपी, मफलर, स्वेटर आणि जॅकेट यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
थंडीच्या तीव्रतेमुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आरोग्य समस्या उफाळून आल्या आहेत. किरकोळ रुग्णसंख्या वाढत असून बालक, वयोवृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
दिवसभर थंडावा टिकून असल्याने नागरिकांना गरम कपड्यांशिवाय बाहेर पडणे अशक्य झाले आहे. पहाटे आणि रात्री थंडी जास्त जाणवत असली तरी दिवसभरही गारठा कायम आहे.
यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना जॅकेट, स्वेटर किंवा मफलर घालणे आवश्यक ठरले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचा विशेष अनुभव नव्हता, मात्र गेल्या चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांना थंड हवेचा सामना करावा लागत आहे.