बेळगाव लाईव्ह : बेळगावातील बिम्स रुग्णालयात एका नवजात बालिकेला आईने टाकून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उपचारादरम्यान या नवजात बालिकेचा मृत्यू झाला असून संबंधित आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बैलहोंगल येथील बीबीजान सद्धाम हुसेन सय्यद या महिलेस ८ डिसेंबर रोजी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, या नवजात मुलीची काळजी न घेता आणि डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता बीबीजान यांनी रुग्णालयातून पळ काढला.
सदर मुलगी उपचाराधीन असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी बिम्स रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा क्रमांक १६०/२०२४ नुसार, भारतीय दंड विधान कलम ९३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून बीबीजान सद्धाम सय्यद यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या घटनेने बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे.