बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने सरकारच्या धोरणांविरोधात निदर्शने करण्यात आली. रखडलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती देणे, औद्योगिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक पार्कची
उभारणी करणे, तसेच जिल्हा रुग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे तातडीने उद्घाटन करण्यात यावे, रुग्णालयात योग्य कर्मचारी नियुक्त करून जनतेला वैद्यकीय सेवा पुरविण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
नाथ पै सर्कल, गोवावेस सर्कल आणि कॉलेज रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम आदमी पक्षाने रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनादरम्यान स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांबाबत चिंता व्यक्त करत ती तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
औद्योगिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक पार्क उभारण्याचीही आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे अभियांत्रिकी व डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
याशिवाय, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधलेले सुपर मल्टीस्पेशालिटी इस्पितळ त्वरित सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इस्पितळामुळे जनतेला अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सुदिन नेसरकर, आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, तसेच रिझवान अहमद मकानदार, विजय पाटील, अमरनाथ नाईक, अनिस सौदागर आणि जुनेद पाशा यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.