बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये होणाऱ्या कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात आवश्यक सर्व ती तयारी पोलीस प्रशासनाने केली असून अधिवेशन काळात किमान सुमारे 5000 पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली.
शहरातील पोलीस आयुक्तालयामध्ये आज गुरुवारी सकाळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळात बंदोबस्ताच्या दृष्टीने आवश्यक अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यास पोलीस महासंचालकांनी संमती दिली आहे.
जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल यांच्यातील समन्वय या संदर्भात माझी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील झाली आहे. अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
अधिवेशन काळात स्थानिक आणि परगावचे असे अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे 5000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जातील. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीचा हा बंदोबस्त असेल.
पोलीस बंदोबस्ता संदर्भात या आधीच मी सुवर्ण विधानसौधला भेट दिली आहे. आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी फेरी मारणार आहे, असे शहर पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी पुढे सांगितले.