Sunday, December 29, 2024

/

मंत्री-आमदार येति बेळगावा – तोचि पाहावा विकासाचा दिखावा…!

 belgaum

बेळगाव लाईव्ह / विशेष : अवघ्या १० – १२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये बेगडी विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील अनेक मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी बेळगाव वारीसाठी बेळगावमध्ये दाखल होत असून या कालावधीत मंत्री – महोदय, प्रशासकीय अधिकारी किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या वाहनाचे नुकसान होऊ नये, कुणालाही वाहनातून प्रवास करताना खड्ड्याचा धक्का लागू नये! यासाठी टेम्पररी मेकओव्हरचा खटाटोप सुरु करण्यात आला आहे.

एरव्ही खड्डे, खराब झालेले रस्ते आणि इतर अनेक असुविधांमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडते. यासाठी नागरिकांना, संघ – संस्था – संघटनांच्या माध्यमातून निवेदने घेऊन प्रशासनाच्या दरबारी, मोर्चे काढून पायपीट करावी लागते. आश्वासनांची खैरात वाटून बराच कालावधी उलटल्यानंतर किंवा एखाद्याचा बळी गेल्यानंतर, अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते. मात्र अधिवेशन काळात प्रशासनाची लगबग झोपेतून उठलेल्या कुंभकर्णाप्रमाणे जागरूक होते, हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक प्रमुख रस्ते कधी नव्हतीचे चकाचक होऊ लागले आहेत. दुभाजकांना नवी ओळख देण्यात येत आहे..! भिंतींची रंगरंगोटी सुरु आहे.. पॅचवर्क, स्वच्छता, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून तयारी या सर्व गोष्टी जय्यत पद्धतीने सुरु आहेत. इतकेच नव्हे तर दुभाजकांवरील कोमेजलेल्या झाडांनाही अधिवेशनामुळेच तजेलदार पणा मिळत आहे! अनेक ठिकाणी सुशोभीकरणाचे कामकाज सुरु आहे. जिल्हा प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका सर्वच पातळीवर पछाडल्याप्रमाणे कामकाज सुरु आहे…! आदेशाची परिपत्रके निघत आहेत… विशेषतः नेहमीच आंदोलने, मोर्चे, वाहतूक, वर्दळीने गजबजलेल्या राणी चन्नम्मा चौकावर अधिक भर दिला जात आहे. ज्या रस्त्यावरून मंत्री, अधिकारी, आमदार, खासदारांची वाहने सुसाट आणि अगदीच खड्डेविरहित रस्त्यावरून जाणार आहेत, त्या ठिकाणचे चौक, तलाव आदी ठिकाणच्या सुशोभीकरणावर अधिक भर दिला जात आहे.City cleann

एकंदर बेळगाव शहरातील विकासकामांचा बडेजाव लक्षात घेता बेळगाव शहराचा काही दिवसांपुरता होणारा कायापालट हा जनतेलाही नजरेला सुखावणारा ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर का होईना.. मंत्री महोदयांच्या आगमनाच्या निमित्ताने का होईना…

बेळगाव शहराचा कायापालट जनतेसाठी नक्कीच समाधानकारक ठरणार आहे. हा बेगडी कायापालट नक्की किती दिवसांपुरता राहील, हाही प्रश्नच आहे! परंतु एरव्ही खड्डेमय, धुळीच्या साम्राज्यातून आणि अनेक कसरतीचा सामना करत जाणाऱ्या नागरिकांना अधिवेशनाचे काही दिवस आणि त्यानंतरचे काही दिवस हे ‘पदरी पडले पवित्र झाले…!’ असेच असतील, यातच सर्व काही मिळविले….!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.