बेळगाव लाईव्ह : येत्या ९ डिसेंबर पासून बेळगाव सुवर्णसौध येथे विधिमंडळ अधिवेशन भरविण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत विधिमंडळ अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
त्यामुळे महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी अधिवेशन संपेपर्यंत कोणीही रजा घेवू नये, असा आदेश बजावला आहे. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत महापालिकेच्या कोणालाही रजा आणि साप्ताहिक सुटी मिळणार नाही.
डिसेंबर महिन्याच्या ९ ते २० तारखेपर्यंत हलगा येथील सुवर्णसौध येथे कर्नाटकचे विधिमंडळ अधिवेशन होणार आहे. अधिवेशनासाठी मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, पत्रकार अशा सुमारे सहा हजार लोकांच्या निवासाची सोय महापालिकेला करावी लागणार आहे.
त्यासाठी शहरातील ८४ हॉटेल्स बुक करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात इतर कोणालाही रूम देण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या आहेत.
या अधिवेशनात महापालिकेकडे निवासाची सोय करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिवेशनासाठी राज्यभरातून लोक येणार असल्यामुळे आणि महापालिकेवर निवासाची जबाबदारी असल्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत कोणीही रजा घेऊ नये. कोणालाही रजा मिळणार नाही.
अत्यावश्यक काळात विभाग प्रमुखांच्या शिफारसीशिवाय कोणतीही रजा देण्यात येणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन करून आपली जबाबदारी टाळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त शुभा बी. यांनी बजावला आहे.