बेळगाव लाईव्ह : येत्या ९ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज अतिरीक्त पोलीस महासंचालक एच. हितेंद्र यांनी बेळगावला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधिवेशनासंदर्भातील तयारीसंदर्भात विविध अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आढावा बैठक घेतली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील सुवर्णसौधला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना एडीजीपी एच. हितेंद्र म्हणाले, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा भरविण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र महामेळावा आयोजित केल्यास समितीवर कारवाई केली जाईल. महामेळावा भरविण्यासाठी समितीला परवानगी दिली जाणार नाही, परवानगी नसूनही मेळावा भरविण्यात आल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
महाराष्ट्र एकीकरण समितीला मागील वर्षीही महामेळावा भरविण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र मागील वर्षी सीमेबाहेर जाऊन त्यांनी महामेळावा भरविला. यावेळीही महामेळावा भरविण्यासंदर्भात तयारी सुरु असून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे यासाठी पोलिस विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अधिवेशनात सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ६००० अतिरिक्त पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येत असून त्यांच्यासह बेळगावमध्ये अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार, मंत्री, खासदार, अधिकारी यांच्या निवासाची, पार्किंगची, जेवणाची सोय कशापद्धतीने करण्यात आली आहे, याचा आज आढावा घेण्यात आला आहे.
यावेळी पोलीस विभागातील रिक्त पदांसंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस विभागासाठी मंजूर पदे भरण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पदांकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल, असे एडीजीपींनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस बेळगावचे आयजीपी प्रकाश कुमार , शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन, मारबनियांग, विजयपूरचे आयजीपी लक्ष्मण निंबरगी, बागलकोटचे आयजीपी अमरनाथ रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.