बेळगाव लाईव्ह :आगामी कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेकडून शहर सौंदर्यकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रमुख रस्त्यांशेजारील आवारांच्या संरक्षक भिंतींच्या रंगरंगोटीला प्रारंभ झाला असून या रंगरंगोटीमध्ये हितावह जनजागृतीला प्राधान्य देण्यात येत आहे.
बेळगाव शहरातील प्रमुख मार्गांवरील 25 संरक्षक आवार भिंतींची रंगरंगोटी केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली असून ही रंगरंगोटी केवळ सौंदर्यीकरण म्हणून न करता त्यातून घनकचरा निर्मूलन व स्वच्छ भारत मिशन बाबत जागृती केली जाणार आहे.
त्यासाठी कचरा वर्गीकरण, घंटागाडी, कचरा प्रक्रिया, ब्लॅक स्पॉट हटाव मोहीम, स्वच्छतागृहांचा वापर, हागणदारीमुक्त प्रभाग याचे महत्व विशद करणारी चित्रे संरक्षक भिंतीवर रेखाटली जाणार आहेत. याखेरीज महान व्यक्ती, साहित्यिकांसह बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची लक्षवेधी आकर्षक चित्रेही रेखाटण्यात येणार आहेत.
रंगरंगोटी केल्या जाणाऱ्या संरक्षक भिंतींमध्ये काँग्रेस रोडवरील संरक्षक भिंत, मॅंगो मिडोज ते खादरवाडी क्रॉसपर्यंतची भिंत, हनुमानवाडी क्रॉस ते कीया शोरूम पर्यंतची भिंत, बालाजी वे ब्रिज मागील बाजू, तिसरे रेल्वे गेट वरील उड्डाण पूल, टीव्हीएस शोरूम ते गजानन साॅ मिल, खादरवाडी क्रॉस येथील संरक्षक भिंत, अलारवाड येथील पुलाची भिंत, जुना धारवाड रोडवरील शाळा क्र. 3 ची भिंत, वडगाव येथील तालुका अधिकाऱ्यांच्या कार्यालय आवाराची संरक्षक भिंत, आरटीओ सर्कल ते चन्नम्मा सर्कल,
आरटीओ सर्कल ते मार्केट पोलीस ठाणे, चन्नम्मा सर्कल ते बीम्स हॉस्पिटल, चन्नम्मा सर्कल ते ज्योती कॉलेज या मार्गांवरील भिंती, कॉलेज रोडवरील संरक्षक भिंत, आरटीओ सर्कल ते कोल्हापूर सर्कल,
चन्नम्मा सर्कल ते कोल्हापूर सर्कल, किल्ला तलाव ते शासकीय विश्राम धाम या मार्गांवरील भिंतींचा समावेश आहे. यावेळी काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी कार्यक्रम होणार असल्यामुळे काँग्रेस रोडवरील संरक्षक भिंतीची रंगरंगोटी प्राधान्याने केली जाणार आहे.