बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील वड्डरवाडी येथील विवाहित महिला व तिच्या आईवर घरात घुसून हल्ला केल्याच्या अलीकडेच घडलेल्या घटनेतील हल्ला झालेल्या महिलेच्या विरोधात एका 11 वर्षीय मुलाने पोलिसांकडे गंभीर तक्रार केल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
वड्डरवाडी येथे एका विवाहित महिलेसह तिच्या आईवर घरात घुसून कपडे फाडून हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर हल्ला झालेल्या महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या शेजारच्या लोकांना अटक करण्यात आली.
त्यापैकी अटक झालेल्या एका महिलेच्या मुलानेच पोलिसात फिर्याद दिली आहे. हल्ला झालेली महिला घरात अनोळखी व्यक्ती आल्यानंतर आपल्याला दारू, सिगारेट तसेच गर्भनिरोधक आणण्यास सांगत होती. हे कळताच माझ्या मुलाला तसली कामे का सांगतेस? असा जाब माझ्या आईने त्या महिलेला विचारला. तसेच यापुढे तसली कामे माझ्या मुलाला सांगू नकोस, असे बजावले.
यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर त्या महिलेनेच आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून माझ्या आईला तुरुंगात पाठवले असे त्या मुलाने तक्रारीत म्हंटले आहे. वड्डरवाडी प्रकरणात संबंधित महिलेच्या हल्ल्याची तक्रार आधी नोंद झाली होती.
मात्र आता 11 वर्षीय मुलाच्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. माळमारुती पोलीस सध्या दोन्ही बाजूंनी सखोल चौकशी करत आहेत.